![]()
पुणे येथे प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनच्या वतीने एकाच वेळी २४ आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही झाले. या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कै. मनोहर य. जोशी स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, भारतीय विद्यातज्ज्ञ आशुतोष बापट यांना कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि प्रसाद प्रकाशनच्या संचालिका डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्र. के. घाणेकर म्हणाले की, लेखक हे साहित्यशारदेचे मानकरी आहेत. ते आपले ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवतात. वाचकांनी आवडलेल्या पुस्तकांच्या लेखकांशी संवाद साधल्यास विचारांची देवाणघेवाण होऊन ज्ञान वृद्धिंगत होते. घाणेकर यांनी पुढे सांगितले की, त्यांची देवावर श्रद्धा आहे. त्यांच्यासाठी पूर्व दिशेला उगवणारा तेजस्वी सूर्य हा देव आहे, कारण सूर्यामुळेच आपण जगतो. सूर्यनारायणाला देव मानण्यामागे शास्त्रीय कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणात जन्म झाल्याने समुद्रही त्यांच्यासाठी देवता असल्याचे ते म्हणाले. हिमालयातील मुक्तिनाथ, लाहौल-स्पीती आणि काझा परिसरात आढळणारे शालिग्राम हे प्रत्यक्षात अमोनाइट प्रकारचे जीवाश्म आहेत. दगडात देव पाहायचा की देवामध्ये दगड, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि दृष्टीचा विषय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पांडुरंग बलकवडे म्हणाले की, २१ व्या शतकात विज्ञान प्रगत होत असल्याने जगात समृद्धी येत आहे. मात्र, विज्ञानाला अध्यात्माची किंवा विचारांची जोड नसल्यास त्याचे परिणाम दिसून येतात. हजारो वर्षांपूर्वी आपली संस्कृती जगाच्या गुरुस्थानी होती आणि भविष्यातही देशातील विचारवंतांना जगाला दिशा देण्याचे काम करावे लागेल, असे ते म्हणाले. आपली संस्कृती विश्वाचे कल्याण चिंतणारी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. आशुतोष बापट यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती, इतिहास आणि वारसा यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत आहे. भारताचा वारसा आणि स्थापत्यवैभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा असून, या पुरस्कारामुळे त्यांना आणखी प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. उमा बोडस यांनी सांगितले की, प्रसाद प्रकाशनला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ पुस्तके प्रकाशित करणे हेच प्रकाशन संस्थेचे काम नसून, लेखकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची सामाजिक जबाबदारीही असते. प्रत्येक पुस्तकामागे लेखकाची साधना असते आणि वाचनसंस्कृती जिवंत ठेवणे ही प्रसाद प्रकाशनची जबाबदारी असून, भविष्यातही ही परंपरा अखंडपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
एकाच वेळी 24 आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन, नवा विक्रम:ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान