Headlines

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 900 वांग्याच्या रोपांची लागवड करत प्रयोग




बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर जिल्ह्यातील जेवळी येथील प्रगतिशील शेतकरी अमन गंपले यांनी अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याच्या रोपांची लागवड करून केवळ नऊ महिन्यांत सुमारे ६ लाख रुपयांचे उत्पादन मिळते. यात दीड लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गंपले यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वी ते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिक पिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, मजुरांची टंचाई आणि बाजारातील चढ-उतार यामुळे अपेक्षित नफा मिळत नव्हता. कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न देणाऱ्या शेतीचा शोध घेत असताना सोलापूर येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या ताईंनी लातूरमधील एका नर्सरीतील विशेष वाणाच्या वांग्याच्या रोपांची माहिती दिली. ही रोपे सहा फूट उंचीपर्यंत वाढतात आणि एकदाच लागवड करून सलग तीन वर्षे उत्पादन देतात, हे समजल्यानंतर त्यांनी हा प्रयोग सुरू केला. गंपले यांनी ६ बाय ४ फूट अंतरावर ९०० रोपे लावली. सुरुवातीपासून सेंद्रिय खतांचा वापर, ठिबक सिंचन, मल्चिंग, संतुलित खत व्यवस्थापन तसेच वेळेवर कीड-रोग नियंत्रण यावर भर दिल्याने झाडांची वाढ जोमदार झाली आणि सातत्याने फळधारणा सुरू राहिली. दरम्यान, या वांग्याच्या लागवडीची वैशिष्ट्ये म्हणजे याची एकदाच लागवड केल्यानंतर सलग तीन वर्षे उत्पादन घेता येते. दररोज तोडणी व नियमित रोख उत्पन्न मिळते. तसेच कमी क्षेत्रात जास्त परतावा देणारा हा प्रयोग ठरत आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत आणि वर्षभर बाजारपेठेत मागणी असल्याने गंपले यांना चांगला फायदा झाला. २० गुंठ्यांचे आर्थिक गणित अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याची रोपे लावून गंपले यांनी नऊ महिन्यांत १,३०० हून अधिक कॅरेट वांग्यांची विक्री केली. प्रति कॅरेट सरासरी ५०० रुपये दर मिळाल्याने त्यांना सुमारे ६ लाखांचे उत्पन्न मिळाले. या प्रकल्पासाठी रोपे, ठिबक सिंचन, खते, औषधे, मजुरी व इतर खर्च मिळून सुमारे दीड लाख रुपये खर्च आला. सर्व खर्च वजा जाता साडेचार लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळाला. विशेष म्हणजे ही वांग्याची लागवड सलग तीन वर्षे उत्पादन देणारी असल्याने पुढील काळातही नियमित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मोबाइल नंबर : 7385848680.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *