![]()
नोकरीच्या आमिषाने थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिकमधील ८ आणि बीडमधील १७ तरुणांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांना तिथे १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे.अडकलेल्या एका तरुणाने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला इथे सायबर फ्रॉड करण्याचा प्रचंड दबाव आहे, कामास नकार दिला तर जीव जाण्याची भीती आहे. आम्हाला तातडीने वाचवा. या तरुणाची आपबिती त्याच्याच शब्दांत.… मी नाशिकमध्ये बीपीओ कंपनीत डेटा एन्ट्रीचे काम करायचो. महिन्याला २० हजार पगार होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने चांगल्या वेतनाची नोकरी शोधत होतो. सोशल मीडियावर मला जाहिरात दिसली-बँकॉकला डेटा एन्ट्रीच्या कामासाठी तब्बल ७० हजार रुपये पगार मिळणार होता. माझ्यासाठी ही एक सुवर्णसंधी होती. एजंटच्या माध्यमातून इंटरव्ह्यू झाला. काही दिवसांतच कंपनीने मला भारतातून बँकॉकसाठी विमानाचे तिकीट पाठवले. दोन-तीन वर्षे मेहनत करून पैसे कमवू आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारू या स्वप्नाने मी जवळ २०-२५ हजार रुपये घेऊन बँकॉकला पोहोचलो. विमानतळाबाहेर येताच कंपनीच्या गाडीत बसलो. त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली. ८ तास प्रवासात ६ गाड्या बदलत मला थायलंड व म्यानमार सीमेवरील जंगलात नेले. हे ठिकाण चीनच्या नियंत्रणाखाली आहे. तिथे त्यांची स्वतःची खासगी आर्मी आहे. प्रत्येकाकडे मशीनगन, एके-४७, एके-६० सारखी शस्त्रे आहेत. या ठिकाणी आमचे लोकेशन ट्रॅक करणेही अशक्य आहे.
तेथे मला चिनी भाषेतील करारावर सही करण्यास भाग पाडले. सुरुवातीला ट्रेनिंग दिली, नंतर हनी ट्रॅप, सायबर फ्रॉडसारखी काळी कामे करायला लावली. रोज १८ ते २० तास आम्ही फक्त सायबर फ्रॉडचे काम करतो. आम्हाला महिन्याला ३ लाख अमेरिकन डॉलर्स कमावून देण्याचे टार्गेट दिले आहे. टार्गेट पूर्ण झाले नाही किंवा कामास नकार दिला तर मारहाण केली जाते. काळोख्या खोलीत नेऊन ७ दिवस अमानुष मारहाण केली, इलेक्ट्रिक शॉकही दिले. त्यामुळे काम करावेच लागते. लोकांना फसवण्यासाठी आम्हाला अमेरिकेतील, यूकेतील किंवा ऑस्ट्रेलियातील भारतीय मुलींचे फोटो वापरून फेक अकाऊंट्स बनवायला सांगितले जाते. समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, क्रिप्टो करन्सी किंवा सोन्यात गुंतवणुकीस भाग पाडले जाते. यासाठी त्यांनी स्पेशल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. आमच्याच देशबांधवांची फसवणूक करत असल्याने आम्ही स्वतःला देशद्रोही समजू लागलो आहोत. जेव्हा आम्ही घरी परतण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी १५ ते २० लाख रुपयांची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच ३ भारतीय मुलांनी असे पैसे भरले होते, मात्र त्यापैकी दोघांना त्यांनी गोळ्या घालून मारून टाकले. त्यामुळे तिसऱ्या मुलाने घरी जाण्यास नकार दिला. आम्ही एका डॉरमेट्रीमध्ये राहतो. जेवायला फक्त भात आणि सॅलड मिळते. अनेकदा मी ३-४ दिवस काहीच खात नाही. आजारी पडलो तरी उपचार मिळत नाहीत, कारण येथील हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च ४० हजार रुपये आहे. त्यांनी आमचे पासपोर्ट आणि घरून आणलेले सर्व पैसे जमा करून घेतले आहेत. दोन महिन्यांपासून काम करत आहे, खिशात एक रुपयाही नाही. घरी जिवंत परत जाईन, अशी आशाही आता उरलेली नाही. या ठिकाणी अडकलेल्यांमध्ये ८ मुलीही आहेत, ज्यांचाही असाच छळ केला जात आहे. दिवसातून फक्त एक तास आम्हाला फोन दिला जातो. त्यानंतर फोन तपासतात, काही चुकीचे आढळले, तर थेट मारून टाकतात. छळाबाबत मी घरी एकही सांगितले नाही. फक्त या ठिकाणाहून आम्हाला बाहेर काढा, एवढेच सांगत आहे. मी रोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, उदयन् राजे तसेच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी संपर्क साधत आहे. रोज या ठिकाणाहून बाहेर काढण्याबाबत शासनाला मेल करत आहे. तरुणांना विनंती, आॅनलाइन नाेकरी शाेधताना नीट खात्री करूनच स्वीकारा
तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की, ऑनलाइन नोकरी शोधताना अतिशय सावध राहा. बँकॉकला नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका. कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्या नाेकरीची नीट खात्री करा, अन्यथा तुम्हीही फसू शकता. तरुणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न राज्यातील डांबलेल्या तरुणांविषयी कळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी इतर काही पीडित तरुणांशी फोनवर संवाद साधत धीर दिला. खा.अशोक चव्हाण यांनी सरकारला पाठपुराव्यासाठी पत्र लिहिले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून यावर चर्चा केली. गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालयही त्या देशातील भारतीय दूतावाताशी समन्वय साधून आहे. शब्दांकन : सचिन जैन
Source link
सायबरमाफियांच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकच्या तरुणाची आपबिती:आम्ही इथून जिवंत बाहेर पडू अशी आशा आता मावळली आहे