Headlines

सातारा LCB तील ‘स्थायी’ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आंदोलन:आर्थिक व्यवहारांचे आरोप; पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन




सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत राहून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीसह तात्काळ बदलीची मागणी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार विजय मोतलिंग यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नाट्यमय आंदोलन छेडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांची बदली व चौकशी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा LCB मधील काही कर्मचारी तब्बल 14 वर्षांपासून त्याच विभागात कार्यरत असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत अनेक नागरिकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल केल्याचा आरोप मोतलिंग यांनी केला. विशेषतः मागासवर्गीय युवकांना लक्ष्य करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच काही कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी संगनमत असून आर्थिक व्यवहार होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अकरा वाजता अर्धनग्न व मुंडन आंदोलन करण्याची घोषणा श्री. मोतलिंग यांनी केली होती. त्यानुसार प्रमोद काळे, महेश आवडे, सुनील कांबळे, अशोक जाधव, सागर भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दाखल झाले. मात्र पोलिसांनी आंदोलनास परवानगी नसल्याचे सांगत त्यांना रोखले. यावेळी आंदोलक व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास शाब्दिक व किरकोळ झटापट झाली. संबंधित कर्मचाऱ्यांची बदली व चौकशी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे श्री. मोतलिंग यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *