![]()
मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातील मानोरी समुद्रकिनाऱ्याजवळ एका परदेशी मालवाहू (कार्गो) जहाजाला अपघात होऊन ते समुद्रातील खडकांमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिस, भारतीय तटरक्षक दल तसेच आयएनएस हमलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जहाजाची पाहणी, तपास आणि पुढील बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मनोरी बंदर परिसरात घटना गोराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनोरी बंदर परिसरात, हिंदू स्मशानभूमीपासून सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावर हे जहाज खडकात अडकलेले आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जहाज भरकटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. जहाजावर कोणत्याही व्यक्तीची हालचाल दिसून आली नाही. तसेच जहाजावरील नाव किंवा ओळख पटविणारा क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याने त्याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. अतिवृष्टीमुळे बचावकार्यात अडचणी स्थानिक मच्छीमार आकाश बंदरकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जहाज त्या भागातील खडकांची माहिती नसल्याने भरकटून अडकले असावे. सध्या सुरू असलेली मुसळधार पावसाची परिस्थिती, समुद्रातील उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांमुळे लहान बोटीने जहाजापर्यंत पोहोचणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे बचाव आणि पाहणीचे काम अत्यंत सावधगिरीने केले जात आहे. सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क घटनेनंतर भारतीय तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जहाजावरील माल, त्याची नोंदणी, अपघाताचे नेमके कारण आणि जहाजावर कर्मचारी आहेत का, याचा तपास सुरू आहे. सध्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली असून पुढील कारवाई संबंधित सागरी यंत्रणांच्या अहवालानुसार केली जाणार आहे. हेही वाचा.. मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन १६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर वाचा नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
मुंबईत मानोरी किनाऱ्यावर परदेशी मालवाहू जहाज अडकले:ना ओळख, ना क्रू मेंबर; तटरक्षक दल अन् पोलिसांकडून तपास सुरू