Headlines

इंधन टंचाईवर नेवासेच्या डॉक्टरांचा डिजिटल तोडगा‎:पेट्रोल-डिझेलची उपलब्धता आता घरबसल्या समजणार, मंत्री विखेंच्या हस्ते उद्घाटन




येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार गळनिंबकर यांनी पूर्णपणे स्वयंनिर्मित व विकसित केलेल्या ‘इंधनशोधक’ या भारतातील पहिल्या रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाइल अॅपचे अधिकृत लाँचिंग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडल्याची माहिती नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. वरुणराज देवरे उपस्थित होते. मुंबईतील कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे व नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले उपस्थित होते. मंत्री विखे यांनी स्वतः अॅपचा वापर करून त्याच्या कार्यपद्धतीची पाहणी केली आणि या उपक्रमाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. डॉ. गळनिंबकर म्हणाले, ‘इंधनशोधक हे देशातील पहिले असे मोबाईल अॅप आहे जे नागरिकांना त्यांच्या परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल व सीएनजीची उपलब्धता रिअल-टाइममध्ये दर्शविते. त्यामुळे इंधनटंचाईच्या काळात नागरिकांना घरबसल्या जवळच्या पंपावरील इंधनस्थितीची माहिती मिळू शकते. अॅपमध्ये थेट जीपीएस नकाशा, सामुदायिक रिपोर्टिंग, पंप मालकांकडून द्विस्तरीय सत्यापन प्रणाली, विश्वासार्ह डेटा व्यवस्थापन, संकटकाळातील क्यूआर-आधारित इंधन रेशनिंग व्यवस्था, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष यंत्रणा तसेच शासकीय वापरासाठी जिल्हास्तरीय निरीक्षण डॅशबोर्ड अशा सुविधा उपलब्ध आहेत. हे अॅप १२ भारतीय भाषांमध्ये विकसित करण्यात आले असून देशातील सर्व २८ राज्यांमध्ये विस्तार करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणताही शासकीय निधी वापरण्यात आलेला नसून संपूर्ण अॅप स्वतःच्या खर्चातून विकसित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. गळनिंबकर यांनी अॅपच्या अधिकृत नोंदणीची माहिती देताना एमएसएई अंतर्गत उद्यम-एमएच ०१-०२९९११८ नोंदणी भारत सरकारकडील एसडब्ल्यू-२६९३७/२०२६ -सीओ कॉपीराइट, तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, पीपीएसी, पीएनजीआरबी यांच्याकडे आवश्यक प्रस्ताव व शिफारसी सादर करण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रीय गरज लक्षात घेऊन विकसित झाले अॅप मार्च ते जून २०२६ दरम्यान आखाती युद्धामुळे तणावामुळे देशात अनेक भागांत पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्वतः डॉक्टरांना इंधन मिळण्यासाठी अडचण आली. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना परिसरातील इंधन उपलब्धतेची अचूक माहिती मिळावी, अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनालाही प्रभावी नियोजन करता यावे या उद्देशाने अॅप विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर या तंत्रज्ञानाचा विचार करावा, अशी मागणीही डॉ. गळनिंबकर यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *