Headlines

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय




पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर, मुळशी, मावळ, हवेली आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून प्रशासन सतर्क झाले आहे. वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्याचा वेढा मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर वाघोली-लोहगाव मार्गावर चार ते पाच फूट पाणी साचले. त्याचवेळी एका खासगी कंपनीची कर्मचारी वाहतूक करणारी बस या मार्गावरून जात असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकली. चालकाने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याची पातळी वाढत गेल्याने बस पूर्णपणे अडकून पडली. बसमध्ये असलेले सहा कर्मचारी आणि चालक घाबरले. पाण्याचा वेग वाढल्याने बसमधून बाहेर पडणेही शक्य होत नव्हते. अग्निशमन दलाची वेळीच धाव घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी दोराच्या साहाय्याने एकामागोमाग एक सर्व कर्मचाऱ्यांना आणि चालकाला सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य जीवितहानी टळली. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले सततच्या पावसामुळे पुण्यातील अनेक सखल भाग, चौक आणि भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील एका भुयारी मार्गात सोमवारी टेम्पो पाण्यात अडकला होता. पाण्याच्या प्रवाहात टेम्पो वाहून जात असल्याचे पाहून बंदोबस्तावरील वाहतूक पोलिसांनी चालकाची वेळीच सुटका केली होती. धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणात सुमारे १५ टक्के, पानशेतमध्ये जवळपास २३ टक्के, वरसगावमध्ये १७ टक्के, तर टेमघरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. एकूण धरणसाठ्यात वाढ होत असून पावसाचा वेग कायम राहिल्यास आणखी वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे दौंडमार्गे उजनी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या अत्यल्प पाणीसाठा असलेल्या उजनी धरणासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. लोणावळ्यात विक्रमी पाऊस पर्यटननगरी लोणावळ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले असले तरी प्रशासनाने पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन आणि पोलिसांचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. विशेषतः भुयारी मार्ग, नदीकाठ, ओढे आणि पाण्याखाली गेलेले रस्ते टाळावेत. ज्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स किंवा बंदोबस्त लावण्यात आला आहे, तेथे प्रवेश करू नये. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास पुणे आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *