![]()
भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘विकासपुरुष’ नरेंद्र मोदी आणि ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे भिंग आता पूर्णपणे फुटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले की, कमिशन खाल्ले पाहिजे, पण ते जरा कमी खा, असे सांगण्याची वेळ आता खुद्द भाजपच्याच नेत्यांवर आली आहे. टेंडरमधून पक्षाला निधी मिळाला आणि नेत्यांना कमिशन मिळाले; पण जनतेचे मात्र कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प कसा कोसळला, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विकासाचे धडे शिकवू नयेत. आमच्या काळात दर्जेदार विकासकामे झाली, तर भाजपची कामे महिनाभरातच कोसळत आहेत. मुंबईसह सर्व मनपाला ओरबडण्याचे काम सुरू संजय राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेबाबत बोलताना राऊत म्हणाले, मुंबई मनपामध्ये शिवसेनेने 25 वर्षे सत्ता उपभोगली, ती जनतेने आम्हाला विश्वासाने दिली होती. आम्ही भाजपसारख्या दानपेट्या पळवून किंवा चोरमार्गाने सत्ता काबीज केलेली नाही. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून मुंबईसह सर्वच मनपाला केवळ ओरबडण्याचे काम सुरू आहे. नाशिक कुंभमेळ्याची लोकांना भीती वाटतेय संजय राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याची जबाबदारी असलेले ‘संकटलोचन मंत्री’ हे सर्वांत जास्त भ्रष्ट आहेत. त्यांनी डोळा उघडला की संकटच येते, म्हणूनच लोकांना आता कुंभमेळ्याची भीती वाटू लागली आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक, संत-महंत नाशिकमध्ये येतील. परंतु, तिथे कोणतीही दर्जेदार कामे होणार नाहीत. कारण कुंभमेळ्याची सर्व कंत्राटे गुजरातच्या कंपन्यांना देण्यात आली आहेत. या कंपन्या येथील नेत्यांना कमिशन देतील, पण कामे मात्र करणार नाहीत, हेच चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हे ही वृत्त वाचा
65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात
सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू असलेली नौटंकी बंद करा,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे सरकारच ही जनगणना करणार असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link