Headlines

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा




मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ असणाऱ्यांनाच परवाना दिला जाईल, अशी मोठी घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. विनापरवाना वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी राज्यातील अनधिकृत वाहतुकीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. “सध्या रस्त्यांवर बेकायदेशीर वाहनांचा आणि विशेषतः विनापरवाना चालणाऱ्या वाहतुकीचा सुळसुळाट झाला आहे. या चालकांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत, ड्रायव्हिंग लायसन्स नाहीत. यामुळे यातून प्रवास करणारे विद्यार्थी आणि महिला अजिबात सुरक्षित नाहीत. त्यामुळे अशा चालकांची तातडीने सखोल चौकशी व्हावी,” अशी जोरदार मागणी आमदार लांडे यांनी सभागृहात केली. ‘महाराष्ट्रात बेकायदेशीर व्यवसाय चालणार नाही; डोमिसाईल सक्तीचे’ आमदार दिलीप लांडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारची स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “राज्यात बाईक-टॅक्सींचे प्रमाण कमी व्हावे आणि बेकायदेशीर वाहतुकीला आळा बसावा, यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. परप्रांतातून लोक बेकायदेशीररीत्या महाराष्ट्रात येतात, बाईक घेतात आणि वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही. यापुढे ज्यांच्याकडे राज्याचे ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ असेल, त्यांनाच वाहतुकीची परमिशन देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.” या निर्णयाचे फायदे सांगताना सरनाईक पुढे म्हणाले की, “या निर्णयामुळे बेकायदेशीर वाहतुकीला कायमचा लगाम लागेल. यामुळे शासनाचा महसूल वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या नवीन आणि हक्काच्या संधी उपलब्ध होतील.” काल पावसामुळे कामकाज करावे लागले होते स्थगित दरम्यान, काल (सोमवारी) मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. अतिवृष्टीच्या या गंभीर परिस्थितीवर अधिक प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघात मदतकार्यासाठी पोहोचता यावे, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला होता. “अतिवृष्टीची परिस्थिती कुणाच्याही हातात नसते. मात्र सर्वांचे सहकार्य असेल, तर ती प्रभावशालीरित्या हाताळली जाऊ शकते. त्यामुळे सर्व सदस्यांनी सतर्क राहून शासनाला मदत करावी,” असे आवाहन अध्यक्ष नार्वेकर यांनी केले होते. आज पावसाचा जोर ओसरल्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी स्थानिकांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *