Headlines

इंद्रायणी पुरामुळे आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंध:केवळ मर्यादित भाविकांनाच मंदिरात प्रवेश, 8 जुलैला सोहळा




इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हा सोहळा साधेपणाने आणि कडक नियमांच्या अधीन राहून आयोजित केला जाईल. संततधार पाऊस आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, केवळ निमंत्रित आणि अधिकृत व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. सोहळ्याची परंपरा कायम राखत केवळ मुख्य मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रतिनिधी यांनाच मंदिरात प्रवेश मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, माउलींच्या रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २५ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० मधील प्रत्येक दिंडीतील केवळ १० वारकरी, संबंधित दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि निमंत्रित प्रतिष्ठित व्यक्ती अशा एकूण सुमारे ९०० जणांनाच या सोहळ्यासाठी मंदिरात प्रत्यक्ष प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. या प्रमुख निमंत्रितांशिवाय, सोहळ्याच्या नियोजनासाठी नियुक्त केलेले खांदेकरी, मंदिर संस्थानाचे कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी-कर्मचारी अशा एकूण सुमारे १,९६० जणांच्या उपस्थितीत हा प्रस्थान सोहळा पार पडेल. प्रशासनाने आणि देवस्थानने सर्व भाविकांना पूरपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला यंदा पुराचा फटका बसला असला तरी, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा प्रस्थान सोहळा शिस्तबद्ध आणि मर्यादित स्वरूपात यशस्वी करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *