Headlines

भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात:पादचाऱ्याला चिरडलं, तीन दुचाकी आणि रिक्षेचंही मोठं नुकसान




मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ आणि सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली ‘बेस्ट’ बस आता रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे का? असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक भीषण घटना भांडुपमधून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला होता. आता भांडुपच्या कोकण नगर परिसरात एका अनियंत्रित ई-बसने रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या भरधाव बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना उडवत एका पादचाऱ्याला थेट चिरडले आहे. या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातानंतर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयाजवळच घडला अनर्थ मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिमेकडील कोकण नगर येथे असलेल्या ‘क्रिटिकल रुग्णालया’जवळ हा विचित्र अपघात घडला. रस्त्यावरून धावणाऱ्या एका ई-बसवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. नियंत्रण सुटलेली ही जड बस थेट रस्त्यावरील इतर वाहनांवर आणि पादचाऱ्यांवर जाऊन आदळली. या अनियंत्रित बसने वाटेत येणाऱ्या तब्बल तीन दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे या सर्व वाहनांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. पादचाऱ्याची प्रकृती चिंताजनक या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बसचे नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला या बसने थेट धडक दिली आणि त्याला चिरडले. या धडकेत सदर पादचारी अत्यंत गंभीररित्या जखमी झाला आहे. डोळ्यांसमोर हा थरार घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या जखमी पादचाऱ्याला स्थानिकांनी लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडी अन् पोलिसांचा तपास सुरू या अपघातामुळे कोकण नगर परिसरात काही काळ मोठा गदारोळ निर्माण झाला होता. रस्त्याच्या मध्यभागी झालेल्या या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बेस्टच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हेही वाचा.. नवी मुंबईत भीषण अपघात: तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून जात असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचा वेग प्रचंड असल्याने 8 ते 10 जणांना अत्यंत तीव्र धडक बसली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की अनेक जण हवेत फेकले गेले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *