Headlines

कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंचा खुलासा:म्हणाले- ती माझ्या मुलीसारखी, मी हात उचलला नाही, कॅमेरा अँगलमुळे तसं दिसतंय




कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्या महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे. केवळ सीसीटीव्हीच्या कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत आहे,” असा दावा करत म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पष्टीकरणानंतर पोलिस त्यांच्यावर काय कारवाई करतात आणि वैद्यकीय संघटना यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘ती फोनवरच बोलत होती, म्हणून मी फक्त हातावर टॅप केले’ या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण देताना रमेश म्हात्रे म्हणाले, “शास्त्रीनगर रुग्णालयात जी धक्काबुक्की झाली, त्याबद्दल मला खंत आहे. पण मी पूर्ण विश्वासाने सांगतो की, मी त्या महिला डॉक्टरवर अजिबात हात उचललेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसत आहे, ते केवळ कॅमेराच्या अँगलमुळे तसे भासत आहे. मी तिच्याशी बोलताना ‘तू’ असा एकेरी उल्लेख केला, कारण ती माझ्या मुलीसारखी आहे; मला तिची वैवाहिक स्थितीही माहीत नाही. आम्ही रुग्णांची समस्या घेऊन गेलो असताना ती आमच्याकडे लक्ष न देता सतत फोनवर बोलत होती. आमचे म्हणणे ती ऐकत नव्हती, म्हणूनच लक्ष वेधण्यासाठी मी फक्त तिच्या हातावर टॅप केले. ‘बाळासाहेबांची शिकवण, महिलांवर हात उचलणार नाही’ स्वतःची बाजू मांडताना म्हात्रे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा दाखला दिला. ते म्हणाले, “आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि शिकवण लाभली आहे. आम्ही कधीही कोणत्याही महिलेवर हात उचललेला नाही आणि भविष्यातही कधी उचलणार नाही. या रुग्णालयातील कारभार आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळेच हा सगळा प्रकार घडला आहे. आम्ही या त्रुटी दूर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.” त्या रात्री नेमके काय झाले? म्हात्रेंचा दावा रुग्णालयात जाण्याच्या कारणाबाबत बोलताना म्हात्रे म्हणाले की, “ज्या लोकांनी मला या घटनेची माहिती देऊन तिथे बोलावले, तेच लोक या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतील. ज्या व्यक्तीने मला फोन केला होता, त्याने नंतर माझे फोन उचलले नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानेच मी स्वतः रुग्णालयात पोहोचलो होतो.” नेमकं काय घडलं होतं? आणि राजकीय पडसाद काल शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. यात म्हात्रे संतापाने महिला डॉक्टर मोबाइलवर बोलत असताना चापट मारली असे स्पष्ट दिसत होते. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती. विरोधक आक्रमक: या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, “गुंडांना बेड्या ठोकून चड्डी-बनियानवर धिंड काढा” अशी आक्रमक मागणी करत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तर, आमदार रोहित पवार यांनी “सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभते का? प्रामाणिक सल्ला देणाऱ्या डॉक्टरची चूक काय?” असा खडा सवाल उपस्थित केला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा दणका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. “कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. दोषींना पक्षाकडून कोणतीही मदत मिळणार नाही,” असा सज्जड इशारा देत त्यांनी पोलिसांना एफआयआर (FIR) दाखल करून कठोर कारवाईचे आदेश दिले होते. संबंधित बातम्या वाचा.. कल्याण मारहाण प्रकरण: श्रीकांत शिंदेंचे कठोर कारवाईचे आदेश; गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, संजय राऊतांचा संताप कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा केडीएमसीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची कडक भूमिका:’मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार’, आबिटकर-कदम यांचा इशारा
केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *