![]()
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे. एफडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात भेसळविरोधी कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकण्यात आल्या. अस्वच्छ किचन, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त उत्पादनांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पनीर, दूध, दही, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात एफडीएने सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण कारवाया होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडूनही या मोहिमेचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांची बदली होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. या चर्चेनंतर सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी त्यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केली. अखेर सरकारने अशा कोणत्याही बदलीचा निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. अलीकडेच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंडे यांना, “‘नायक’ चित्रपटाप्रमाणे तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री आणि सर्व अधिकार दिले, तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी अत्यंत संयत भूमिका मांडली. “लोकशाही व्यवस्थेमध्ये कुणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी नेहमी सांगतो की, एक शासकीय कर्मचारी म्हणून आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करणे हीच आपली जबाबदारी आहे,” असे मुंडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “समाजाला सक्षम करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हेच महत्त्वाचे आहे. समाज जितका विकसित होईल, तितका देश आणि देशातील प्रत्येक नागरिक विकसित होईल. मला कोणतीही जबाबदारी दिली तरी त्या पदावरून व्यवस्था आणखी एक पाऊल पुढे कशी नेता येईल, काम अधिक पारदर्शक आणि परिणामकारक कसे करता येईल, यालाच माझे प्राधान्य असेल. मी एक शासकीय सेवक आहे आणि माझ्या अधिकारांच्या मर्यादा मला पूर्णपणे माहिती आहेत. लोक मला नायक म्हणत असतील तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” मुंडे यांच्या या उत्तरानंतर त्यांच्या प्रशासकीय कामकाजाइतकाच त्यांच्या विचारांचाही सोशल मीडियावर गौरव केला जात आहे. अधिकारापेक्षा जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. कोण आहेत तुकाराम मुंडे? तुकाराम मुंडे हे 2005 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. कठोर, पारदर्शक आणि तडजोड न करणारे प्रशासक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक महापालिका आयुक्त, नागपूर महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई विद्युत व परिवहन उपक्रम (BEST) महाव्यवस्थापक तसेच विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. नियमांचे काटेकोर पालन आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सध्या ते महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त असून राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या व्यापक कारवायांचे नेतृत्व करत आहेत. संबंधित बातमी वाचा… तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा व्हीआयपी लॉबीला न जुमानता त्यांनी केलेल्या या बेधडक कारवाईचे सध्या संपूर्ण राज्यभरातून मोठे कौतुक केले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंडेंचं बेधडक उत्तर; म्हणाले- 'मी एक शासकीय सेवक, लोक नायक म्हणत असतील तर त्यांचा आभारी!'