Headlines

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग:विष्णुपुरीतील थरारक VIDEO समोर; दोन विद्यार्थिनी जखमी




शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे काम अद्याप प्रगतीपथावर असतानाच पूल कोसळल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविद्यालयासमोरच घडला थरार; २ विद्यार्थिनी जखमी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी कॉलेज सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेत घडली. विष्णुपूरी हा परिसर शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. उड्डाणपुलाचा महाकाय भाग अचानक खाली कोसळल्याने तेथून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी ढिगाऱ्याच्या कचाट्यात आल्या आणि जखमी झाल्या. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पूल कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आणि ढिगाऱ्याचे साम्राज्य पसरल्याने परिसरात काही काळ एकच धावपळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत वर्दळीचा रस्ता, मोठा अनर्थ टळला! विष्णुपूरी हा भाग नांदेडमधील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता मानला जातो. याच परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि अनेक नामांकित अभियांत्रिकी व शैक्षणिक संस्था आहेत. महामार्ग असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. सुदैवाने पूलाचा भाग कोसळला तेव्हा त्याखाली कोणतीही मोठी गाडी किंवा लोकांचा घोळका नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी विशेष म्हणजे, या महामार्गाचे आणि पुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. काम प्रगतीपथावर असतानाच पुलाचा पाया आणि बाजूचा भाग खचून खाली येणे, हा सरळ-सरळ निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा नमुना असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील इतर मोठ्या प्रकल्पांमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आल्या असताना, आता नांदेडमधील या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण दुर्घटनेची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करून, संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नांदेडकरांमधून होत आहे. तसेच, पुलाची सुरक्षितता तपासून उर्वरित भागाची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची मागणीही करण्यात येत आहे. हेही वाचा.. मराठवाडा हादरला:हिंगोलीसह परभणी-नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, मध्यरात्री जमीन हादरल्याने नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागांत मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *