Headlines

नागपूरमध्ये भरणार 'ब्रिक्स' परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक:शाश्वत वाहतूक- AI तंत्रज्ञानावर 11 देशांचे प्रतिनिधी करणार मंथन




महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे 11 आणि 12 जुलै 2026 रोजी ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीत सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी शाश्वत परिवहन व्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक संपर्क व्यवस्थेवर सखोल चर्चा करतील. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि स्थिरतेसाठी निर्माण” अशी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला चालना देणे हा या बैठकीचा मुख्य हेतू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. रशिया आणि ब्राझीलमधील पहिल्या दोन यशस्वी बैठकांनंतर, नागपूरमधील ही तिसरी बैठक आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्य मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत शाश्वत विमान इंधन, आधुनिक शहरी वाहतूक, बहुआयामी परिवहन प्रणाली, सक्षम लॉजिस्टिक्स पुरवठा साखळी, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उपाय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या जागतिक महत्त्वाच्या विषयांवर विशेष मंथन केले जाईल. विस्तारित ब्रिक्स समूहात आता भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या 11 देशांचा समावेश आहे. हा समूह जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. या देशांमधील मजबूत परिवहन सहकार्यामुळे आंतरखंडीय संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत होईल आणि जागतिक व्यापाराला गती मिळेल. या बैठकीमुळे नागपूर शहराची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *