Headlines

धरणातून 27 हजार क्युसेक पाणी सोडले:पुण्यात मुठा नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद




पुण्यातील मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरण साखळीतून 27 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. बुधवारी रात्री खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी, धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सोमवारी सकाळी 27 हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरापासून डेक्कन जिमखाना आणि डेक्कन जिमखान्यापासून एरंडवणे भागातील रजपूत वीटभट्टी परिसरापर्यंतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कोथरूड आणि एरंडवणेकडे जाण्यासाठी या रस्त्यांचा वापर केला जातो. मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करून तेथे पोलिसआणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. नदीकाठाला लागून असलेल्या वसाहतींमधील रहिवाशांना प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. नदीपात्रात लावलेली अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. पाणी ओसरेपर्यंत नदीपात्रातील रस्ते वाहतुकीस बंद राहतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकाजवळ मध्यरात्री एक मोठे झाड कोसळले. शिवाजीनगर भागातील एका सोसायटीसमोर ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांद्या कापल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. या घटनेमुळे सदर मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *