![]()
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गाडी अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडीत अमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा खोटा आरोप करत ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भूषित उमेश शर्मा हे त्यांच्या तीन मित्रांसह टाटा पंच कारने पुणे येथून लोणावळ्याकडे जात होते. मावळ तालुक्यातील ताजे गावाच्या हद्दीत एका अंबर पिवळा दिवा लावलेल्या झायलो कारने त्यांची गाडी अडवण्यात आली. महामार्ग पोलिसांचा गणवेश घातलेल्या सहा जणांनी शर्मा आणि त्यांच्या मित्रांना अडवून त्यांच्या गाडीत ड्रग्ज असल्याचा खोटा आरोप केला. कारवाईची भीती दाखवून ती टाळण्यासाठी आरोपींनी ५ लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या पर्यटकांना आरोपींनी पैसे काढण्यासाठी तळेगावच्या दिशेने नेले. तळेगाव येथे एटीएममधून पैसे काढण्याची सक्ती केली जात होती. यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर शर्मा यांनी तात्काळ कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपासामध्ये हे सर्व संशयित खंडाळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पोलीस नाईक (चालक) अमोल वायकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नन्नवरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार ढवळे, वॉर्डन किसन बोम्बले आणि नितेश चव्हाण यांचा समावेश आहे. एकूण सहा संशयितांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, तुषार घाडगे नावाचा एक वॉर्डन अद्याप फरार आहे. दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कामशेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पर्यटकांना लुटणारे पोलिस गजाआड:'ड्रग्ज'ची भीती दाखवून मागितली 5 लाखांची खंडणी