![]()
पुणे येथे विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार आणि तंत्रज्ञांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात रंगभूमीच्या यशामागील खऱ्या आधारस्तंभांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी अभिनेते प्रवीण तरडे, तेजस बर्वे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन आणि सौ. वृषाली पटवर्धन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पडद्यामागील कलाकारांचे योगदान नाटकाच्या यशासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल गजेंद्र वाणी (प्रकाशयोजना सहाय्यक), अभिजित इनामदार (संगीत संयोजन), मंदार बापट (व्यवस्थापक), कमलेश बिचे (रंगभूषाकार), निलेश खेडकर (प्रॉपर्टी), दीपक कांबळे (कपडेपट), संदीप देशमुख (नेपथ्य निर्माण), संजय विसाळ (भोजन व्यवस्था), मधुरा ताम्हणकर (केशभूषा) आणि संजय चौखंडे (वाहनचालक) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अभिनेते प्रवीण तरडे यांनी संघर्षाच्या काळात मदतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “नाटक आपल्याला संघर्ष शिकवते. नाट्यगृहात नटाचे प्रशिक्षण होते. बॅक स्टेजच्या पाठीशी खंबीर उभे राहायला हवे. धडपडीच्या काळात मदत मिळाली पाहिजे आणि मदत केली सुद्धा पाहिजे.” आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करणार प्रवीण तरडे यांनी पुढे सांगितले की, ‘देऊळ बंद – 2’ च्या यशातून मिळालेल्या पैशातून ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करत आहेत. मदत घेणाऱ्याने सक्षम झाल्यावर इतरांना मदत करावी, इतकीच अट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारचे तांत्रिक कुशल कामगार तयार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तंत्रज्ञांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पडद्यामागील कलाकारांना गौरवण्याचा पटवर्धन फाऊंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. रंगमंचावरील प्रत्येक यशस्वी प्रयोगामागे प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, केशभूषा, संगीत संयोजन, प्रॉपर्टी, कपडेपट, व्यवस्थापन, भोजन व्यवस्था आणि वाहन व्यवस्था अशा विविध विभागांतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे योगदान अमूल्य असते, असे वक्त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमाला कपिल जोशी, प्रसाद शिवरकर, तेजस देवधर, उल्लेश खंदारे आणि सुलेखा तळवलकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमानंतर पक्ष्यांच्या विविध आवाजांचा अर्थ उलगडणारा आणि त्यावर आधारित गीतांचा “पहल” हा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजय पटवर्धन म्हणाले की,पडद्यामागचे कलाकार हेच सेलिब्रिटी असतात.पडद्यामागच्या कलाकारांमुळे आपण यशस्वी होतो. त्यांना गौरविण्याचा, कौतुकाची थाप पाठीवर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
Source link
विजय पटवर्धन फाऊंडेशनकडून पडद्यामागील कलाकारांचा सन्मान:संघर्षात मदत महत्त्वाची, प्रवीण तरडे यांचे प्रतिपादन