![]()
सेनगाव ते रिसोड मार्गावर सुलदली फाटा येथे सेनगाव पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये पानमसाल्या सोबतच गुटख्याची वाहतूक करणाऱ्या जीपसह 2.09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 9 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पो
.
सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षस संग्राम जाधव यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. त्यानुसार सेनगाव ते रिसोड रोड मार्गावर एका जीपमधून प्रतिबंधित पान मसाला व गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार परसराम नागरे, सुभाष चव्हाण, राजू जाधव, जीवन मस्के यांच्या पथकाने गुरुवारी ता. 9 वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी पोलिसांनी एक जीप थांबवून त्यातील विशाल गंगावणे (रा. अगरवाडी, ता. रिसोड) यांची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. पोलिसांनी जीपची तपासणी केली असता त्यात गुटखा व प्रतिबंधित पानमसाल्याचे पुडे आढळून आले. यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला, राजनिवास सुगंधीत पान मसाला, प्रिमियम नजर, जाफरानी जर्दासह इतर पुडे आढळून आले.
पोलिसांनी जीप व पानमसाला जप्त करून सेनगाव पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनी विशालची अधिक चौकशी केली असता त्याने इम्रानखान पठाण (रा. अमरदासनगर, रिसोड) याच्या सांगण्यावरून मसाला व गुटखा पुडे नेले जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी जामदार परसराम नागरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल गंगावणे व इम्रानखान पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार राजू जाधव पुढील तपास करीत आहेत.