![]()
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुहास कांदे जे काही बोलले असतील, त्यामध्ये 100 टक्के तथ्य आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आल्याची टीका केली. आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातबाजीवर सडकून टीका केली. सत्ताधारी पक्षाने लाडकी बहीण, शेतकरी, भजणी मंडळ आणि वारकरी अशा समाजातील सर्वच घटकांची फसवणूक करून सत्ता मिळवली आहे, असे ते म्हणाले. वारीसाठी निधी देण्याचे, भजणी मंडळांना सरकारी तिजोरीतून पैसे देण्याचे आणि लाडक्या बहिणींना आर्थिक मदत देण्याचे खोटे गाजर या सरकारने दाखवले. आता आपण जनतेला सहज फसवू शकतो आणि भविष्यातही काहीतरी नवीन फंडे काढून पुन्हा सत्ता मिळवू शकतो, अशा गैरसमजात सरकार वागत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपला त्यांच्याविरोधात कोणी बोललेले खपत नाही भाजपच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. भाजप स्वतः इतरांबद्दल काहीही खोटे बोलली तरी लोकांनी ते ऐकले पाहिजे, पण आपल्याविरोधात कोणी बोललेले त्यांना खपत नाही, अशी त्यांची वृत्ती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मोठा अहंकार आला असून ते विरोधकांना जाहीरपणे धमकावत आहेत. विरोधकांनी राज्यातील सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, तर ती ऐकून घेण्याची मनस्थितीही मुख्यमंत्र्यांची राहिलेली नाही, असे जाधव म्हणाले. म्हणून भातखळकरांना जागा दाखवावी लागली विधानसभेतील एका प्रसंगाचा उल्लेख करत जाधव यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर वैयक्तिक प्रहार केला. भातखळकर पूर्वी विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टोकाची आणि खोटी टीका करायचे. पण आता आपण जे खोटे बोलतोय त्यावर विरोधकांनी गप्प राहावे, अशी त्यांची अपेक्षा असते. काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मला त्यांची योग्य जागा दाखवावी लागली, असे सांगत, भाजप तिकीट देणार नाही म्हणून भातखळकर राज ठाकरेंकडे गेले होते आणि राज ठाकरेंनी स्वतः गडकरींना फोन करून हा प्रकार सांगितला होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? भास्कर जाधव म्हणाले की, पूर्वी विरोधकांना ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’ असे विरोधकांना सुनावणारे मुख्यमंत्री आज स्वतः ‘मी म्हणजेच महाराष्ट्र’ अशा थाटात वागत आहेत. महाराष्ट्राचा अपमान नक्की कशामुळे झाला, असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले, छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू-संतांचा अपमान कोणी केला, तसेच ओबीसी आणि धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली कोणी फसवले, हे उभ्या महाराष्ट्राला चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी महायुती सरकारचा बुरखा टराटरा फाडला.
Source link
महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार:जनतेला फसवण्याचे नवे फंडे शोधण्यात सरकार व्यस्त, आमदार भास्कर जाधवांची खोचक टीका