Headlines

हिंगोलीत पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त:15.10 लाखांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांवर गुन्हा दाखल




हिंगोली शहरात पोलिसांची नजर चुकवून भल्या पहाटे वाळू वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजता पकडले आहे. यामध्ये टिप्परसह १५.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली आहे. शहरी व ग्रामीण भागातून बेकायदेशीर दारु विक्रीचे अड्डे, जुगार, मटका अड्डे यांची माहिती घेऊन छापासत्र सुरु करण्यात आले आहे. या शिवाय गुटखा वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. या शिवाय वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी विविध पथके स्थापन केली आहेत. या शिवाय हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर यांनीही दोन पथके स्थापन करून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर भागात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे टिप्पर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकुर, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, बाबासाहेब कांबळे, अंभोरे यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजल्या पासून वाहनांची तपासणी सुरु केली होती. साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक टिप्पर पोलिसांनी थांबविले. यावेळी टिप्पर चालक लखन घुगे (रा. भगवा, ता. आैंढा), याची चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी जमादार कांबळे यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक लखन व दीपक कऱ्हाळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार अंभोरे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *