Headlines

मंदिर विधेयकावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल:अयोध्येच्या तिजोरीत चोरी, मग रामटेक देवस्थानात राजकारणी कशाला?




राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा असताना, रामटेकसारख्या ऐतिहासिक मंदिराच्या व्यवस्थापनात घाईघाईने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “या मंदिराच्या विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींची नेमणूक करू नये, तसेच विश्वस्तांना भाविकांच्या दानातून भत्तेही देऊ नयेत,” अशी स्पष्ट भूमिका मांडत वडेट्टीवार यांनी हे विधेयक तातडीने संयुक्त समितीकडे पाठवण्याची जोरदार मागणी केली आहे. विद्यमान समितीत गडबड नाही, मग घाई का? विधानसभेत विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तीन आठवड्यांचे अधिवेशन असताना हे विधेयक नेमके अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का आणले गेले? इतकी घाई का केली जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाच्या आदेशानुसार काम करत असलेल्या विद्यमान समितीच्या कारभारात कोणताही गैरव्यवहार किंवा गडबड नसताना, नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याची आवश्यकताच काय, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. “राजकारणी नकोत, भत्तेही देऊ नका” मंदिराच्या व्यवस्थापनात राजकारण आणल्यास जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “विश्वस्त मंडळात आमदार, मंत्री किंवा नगराध्यक्ष नसावेत. ते आपापल्या मतदारसंघात व्यस्त असतात, मग मंदिराचा कारभार कोण पाहणार? त्याऐवजी सेवाभावी, निष्कलंक आणि श्रद्धेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच, प्रभू रामचंद्राच्या मंदिरात काम हे सेवेच्या भावनेने झाले पाहिजे, भाविकांच्या दानातून विश्वस्तांना भत्ते का दिले जाणार? असा आक्षेपही त्यांनी नोंदवला. अयोध्येचा संदर्भ आणि वाजपेयींच्या विधानाचा दाखला यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी अयोध्येतील राम मंदिराचाही संदर्भ दिला. अयोध्येच्या राम मंदिराच्या तिजोरीत चोरी झाल्याच्या वृत्ताने श्रद्धाळूंना धक्का बसला आहे; जिथे श्रद्धा आहे, तिथे पारदर्शकता हवीच, असे ते म्हणाले. तसेच, कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीची विश्वस्तपदी नियुक्ती होऊ नये, यावर भर देताना त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध विधानाचा दाखला दिला. “अगर पहरा देने वाला कुत्ता चोरों को देखकर न भोंके, तो समझना चाहिए कि वो चोरों को जानता है,” अशी आठवण करून देत, विश्वस्त मंडळावर नेमणूक करताना सरकार कोणाची नेमणूक करते, हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रभू राम हे राजकारणाचे नव्हे, संस्कृतीचे प्रतीक” रामटेक मंदिर हे हजारो वर्षांची परंपरा जपणारे श्रद्धास्थान आहे. प्रभू राम हे राजकारणाचे नव्हे तर संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे मंदिराच्या पवित्रतेत राजकीय हस्तक्षेप न होता, पारदर्शक व्यवस्था उभी राहिली पाहिजे. यासाठी या विधेयकातील तरतुदींचा सखोल विचार होणे गरजेचे असून, हे विधेयक तातडीने संयुक्त समितीकडे पाठवावे, अशी आग्रही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हेही वाचा.. राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही सांगेन, तोपर्यंत मौन; रामचरितमानसमधील चौपाई पोस्ट केली अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या X अकाउंटवर लिहिले – ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’। म्हणजे – धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी या चौघांची खरी परीक्षा संकटाच्या वेळीच होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *