Headlines

पुणे तिथे काय उणे:पुण्यातील बावधन भागात ओढा बुजवून बांधकाम; नागरिकांच्या घरात पाणी, सुप्रिया सुळेंची तात्काळ कारवाईची मागणी




पुण्यातील बावधन बुद्रुक भागात एका बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह (केतकीचा ओढा) पूर्णपणे बुजवून प्लॉटिंग व बांधकाम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून हा प्रकार समोर आणला आहे. या पोस्टसोबत त्यांनी परिसराचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. केतकीचा ओढा बुजवल्याने नागरिकांच्या घरामध्ये शिरत असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. काय आहे मुख्य समस्या? बावधन बुद्रुक येथील रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसराजवळ ‘निसर्ग पाम सोसायटी’ या बंगलो प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला ‘केतकीचा ओढा’ पूर्णपणे बुजवण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्ग बंद झाला आहे. पाण्याचा मार्ग अडवला गेल्याने पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नागरिक, व्यावसायिकांना फटका पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान होत आहे. निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पाण्याखाली जात आहे. अनेकदा दुचाकी वाहने अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ रहिवाशांनाच नाही, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. सुप्रिया सुळे यांची प्रशासनाला विनंती पुण्यातील बावधन येथील या गंभीर समस्येवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थितीची पाहणी व पडताळणी करावी, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, भविष्यात नागरिकांना असा त्रास होणार नाही, यासाठी पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आता जिल्हा प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांची पोस्ट जशीच्या तशी… ‘बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *