![]()
राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी शेजारील तेलंगणा राज्यात भात लावणीच्या कामासाठी गेलेल्या या मजुरांच्या वाहनाला रामगुंडम परिसरात मोठा अपघात झाला. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील हे मजूर शेतातील काम आटोपून आपल्या निवासाच्या ठिकाणी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की, वाहनातील चार जणांनी घटनास्थळीच प्राण सोडले. मृतांमध्ये अतुल वासुदेव सोनले (45), अर्चना जनार्दन सोनले (40), प्रभा सीताराम मोहर्ले (56) आणि रंजना प्रभाकर शेंडे (50) यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे हे सर्व मजूर भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणात गेले होते. मात्र, त्यांच्यावर ओढवलेल्या या भीषण प्रसंगामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण पवना चक गावात आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवत सर्व 27 जखमी मजुरांना रामगुंडम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यापैकी काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, मृत मजुरांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, चंद्रपूरला आणण्यासाठी आणि जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Source link
चंद्रपूरच्या शेतमजुरांवर काळाचा घाला:भीषण अपघातात 4 मजुरांचा जागीच मृत्यू, तर 27 जखमी; पवना चक गावावर शोककळा