![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक दुरुस्त्या दूर केल्याशिवाय नागरिकांना वेळेवर पाणी मिळणे शक्य नाही, असे मत जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले. मराठवाडा पाणी परिषदेतर्फे ग्राम विकास भवन, एन-२ सिडको येथे आयोजित ‘जलमंथन’ उपक्रमात ते ‘छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना व सद्यस्थिती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, माजी सहायक अधीक्षक अभियंता डॉ. जयसिंग हिरे, दादासाहेब शिंदे आणि जलधोरण नियोजक रामचंद्र पिल्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दाते पाटील यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरकर अनेक वर्षांपासून नियमित पाणीपुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, प्रस्तावित ५० पेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. तसेच, २५०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी अपूर्ण असून ९०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी व मुख्य जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्टिंग करणे आवश्यक आहे. शहरातील सामान्य ग्राहकांपर्यंत जलवाहिनीचे मोठे काम बाकी आहे. शहराची पाण्याची गरज साधारणतः ३७५ ते ४०० द.घ.ली. असताना, सद्यस्थितीत केवळ १५० ते १७० द.घ.ली. पाणी उपलब्ध होत आहे. पाणी साठवणूक क्षमता आणि ग्राहकांपर्यंत पाईपलाईन न पोहोचल्यामुळे पाणी वाढवूनही नागरिकांना आठ दिवसांतून एकदा, तेही अनियमित वेळेत पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत दररोज वेळेवर व पुरेसे पाणी मिळणे हे दिवास्वप्नच असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. जयसिंग हिरे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. शहराची पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, यासाठी लवकरच ‘जलमंथन’ समूहातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आशिया खंडात वेगाने वाढणाऱ्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराला नियमित पाणीपुरवठ्याची नितांत गरज आहे. यासाठी समाजातील बुद्धीवादी, जल अभ्यासक आणि जागरूक नागरिकांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात सिंदोन गावचे प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांना वसंतराव नाईक संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा ‘फुलशेती पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठातील जी.एम.एन.आय.आर.डी. चे डॉ. राहुल महामुनी, जयप्रकाश बागडे, शिवाजी घुगे, सतीश वानखेडे, भारती खरटमल, अशोक कोळी यांच्यासह जलक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source link
संभाजीनगर पाणी योजना:तांत्रिक दुरुस्त्यांमुळे वेळेवर पाणी नाही, जल अभ्यासक डॉ. दाते पाटील यांचे मराठवाडा पाणी परिषदेत मत