Headlines

डीजेच्या मिरवणुकीतून बाहेर या:डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला राज ठाकरेंचा थेट संदेश; जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर प्रहार




डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत वेगळ्याच मुद्द्यावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे देशासाठीचे योगदान अमूल्य असल्याचे म्हटले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले काम पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. तसेच ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या त्यांच्या ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी बाबासाहेबांच्या आर्थिक दृष्टिकोनाचीही आठवण करून दिली. भारतीय अर्थव्यवस्थेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सखोल अभ्यास होता आणि त्यातूनच रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया घातला गेला, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. याच वेळी त्यांनी आजच्या साजऱ्या होणाऱ्या जयंतींच्या स्वरूपावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान नेत्यांचा वारसा केवळ पुतळे उभारणे किंवा मिरवणुका काढणे इतक्यावर मर्यादित ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्कश्य डीजे लावून मिरवणुका काढण्यातून बाहेर पडून त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आजच्या राजकारणात विकासाची संकल्पना केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित केली जात आहे. मात्र, समाजातील मोठा वर्ग अजूनही या विकासापासून वंचित आहे. अशा परिस्थितीत बाबासाहेबांसारख्या व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज अधिक जाणवते. त्यांच्या विचारांचा खरा अर्थ समजून घेतला, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत केला. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे ! बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *