Headlines

वाशिम जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल:धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश




जमीन अधिग्रहणाच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने वाशिम जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सरकारी यंत्रणांनी न्यायालयाच्या आधीच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल घेत, मुख्य जिल्हा न्यायमूर्तींनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) मोठा दणका दिला असून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे कडक आदेश जारी केले आहेत. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांची अकृषक जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित करताना, प्राधिकरणाने त्यांना रस्ते व खुल्या जागेचा मोबदला नाकारत केवळ प्लॉटचा आणि तोही बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दराने मोबदला देऊन त्यांची मोठी फसवणूक केली. या अन्यायाविरोधात गर्जे कुटुंबाने जिल्हाधिकारी आणि न्यायालयात दाद मागत प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. अखेर न्यायालयाने या प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश दिले. परंतु प्राधिकरणाने मात्र या न्यायालयीन आदेशाची कोणतीही अंमलबजावणी न करता त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. 20 जुलै पर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम जमा करावी न्यायालयाच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन झाल्याने संतप्त झालेल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा तोंडगाव येथील टोल प्लाझा थेट जप्त करण्याचे वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांची बाजू मांडणारे वकील उदय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने प्राधिकरणाला शेतकऱ्यांची थकीत रक्कम जमा करण्यासाठी 20 जुलै 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. 21 जुलै रोजी टोल प्लाझा जप्त केला जाईल या दिलेल्या मुदतीत जर प्राधिकरणाने पैसे भरले नाहीत, तर 21 जुलै रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन टोल प्लाझा जप्त करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. न्यायालयाच्या या धडक आणि आक्रमक निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हा महत्त्वपूर्ण निकाल देशभरातील इतर अन्यायग्रस्त आणि पीडित शेतकऱ्यांसाठी न्यायाचा एक नवा आशेचा किरण ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *