![]()
विद्यार्थी हा समाजाचा व राष्ट्राचा भावी कणा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गत सात दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन अभाविपचे कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांनी केले. नथमल गोयनका विधी महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महानगरातर्फे ९ जुलै रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्यात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी मंचावर अभाविप विदर्भ प्रांत सहमंत्री रिदम शहा, महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर व महानगर मंत्री परीक्षित कोल्हे उपस्थित होते. ॲड. गोखले पुढे म्हणाले की, अभाविपने आपल्या स्थापनेपासूनच ‘ज्ञान, शील व एकते’चे ब्रीद स्वीकारून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता समाज जीवनातील विविध जबाबदाऱ्यांसाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेपासून विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांपर्यंत, महिला सुरक्षेपासून रोजगाराभिमुख कौशल्य विकासापर्यंत, पर्यावरण संवर्धनापासून सामाजिक जनजागृतीपर्यंत अनेक विषयांवर परिषद सातत्याने कार्यरत आहे. नेतृत्व, संवादकौशल्य, संघटनशक्ती, सामाजिक दायित्व गुणांचे महत्त्व अधिक वाढले आहे. अभाविपच्या उपक्रमांमधून हे गुण विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून विकसित होत आहेत. कार्यशाळांतून नेतृत्वाचा विकास विविध प्रशिक्षण शिबिरे, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, अभ्यासवर्ग, संघटनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्वाची प्रत्यक्ष संधी दिली जाते. कार्यक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, संघभावनेने काम करणे, प्रभावी संवाद साधणे आणि संकटसमयी निर्णय घेणे आदी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होते.
Source link
विद्यार्थी दिन साजरा:विद्यार्थी नेतृत्व घडवण्यात अभाविपचे योगदान, ॲड. गिरीश गोखले यांचे प्रतिपादन