.

दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला.
‘दिव्य मराठी’च्या या अभियानात अमोल घायवट यांच्या ‘युवा लोकचळवळ’ या सामाजिक संस्थेनेही सहभाग नोंदवला आहे. त्यांनी जांब गावातील शाळा, मोकळ्या जागा तसेच परिसरातील गावांमध्ये यावर्षी १० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाची सुरुवात पातूर तालुक्यातील कोठारी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षरोपणाने करण्यात आली. आलेगाव येथील शाळेतही वृक्षलागवड करण्यात आली. आलेगाव येथे गतवर्षी लावलेली वडाची सर्व ७० झाडे चांगली मोठी झाली आहेत. युवा लोकचळवळ यांच्या पुढाकारातून तीन शाळांमध्ये सुमारे २५० झाडे लावण्यात आली आहेत. ‘युवा लोकचळवळ’ यांच्या वतीने कोठारी बु. येथील शाळेत सावली देणारी, फळझाडे व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. रोपांची नियमित देखभाल व संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी विद्यार्थी व शिक्षकांनी स्वीकारली असून पर्यावरण संवर्धनाची शपथही घेतली आहे. याप्रसंगी पंचायत समिती (पातूर) चे विस्तार अधिकारी लव्हाळे, युवा लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष अमोल घायवट, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमातून एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला जात आहे की, वृक्षांना लावण्यासाठी जशी जागा लागते, तसेच त्यांच्या वाढीसाठी संरक्षणाचीही गरज असते.
जगवण्यावर भर नुसते वृक्षारोपण करून न थांबता, लावलेली झाडे जगवण्यावर भर देत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन आलेगाव येथे करण्यात आले आहे. गतवर्षी लावलेल्या व यशस्वीपणे संगोपन झालेल्या झाडांचा वाढदिवस २० जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी येथील शाळेच्या आवारातही वृक्षारोपण केले जाणार आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत केवळ झाडे लावणे हा उद्देश न ठेवता त्यांच्या संगोपनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गतवर्षी आलेगाव येथे वड व पिंपळाची वृक्ष लावली होती. ग्रामस्थांनी या वृक्षांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केले. यामुळे गतवर्षी लावलेल्या वड व पिंपळाच्या तब्बल ७० झाडांनी तग धरला असून या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.