![]()
देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळण्याची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या सदोष धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन सादर करण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अमरावती जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग नोंदवला. काही ठिकाणी मनपा हद्दीतील आरोग्य केंद्रांतील आशा वर्कर्सनी काळे ड्रेस व साड्या परिधान करून काळा दिवस पाळला. त्यांनी आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनात भाग घेतला. न्याय्य मागण्यांसाठी पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, मार्च २०२५ मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेल्या आशा सेविकांच्या प्रोत्साहनपर मानधनवाढीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे वाढीव प्रोत्साहन रक्कम तत्काळ अदा करावी. गेल्या एका वर्षाची थकबाकी द्यावी. यासंदर्भातील शासन आदेश तातडीने काढावेत. ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. आशा सेविका अत्यल्प मानधनावर आरोग्य विभागातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. अनेक अतिरिक्त कामांचा ताण आहे. अहवाल सादर करण्याची सक्ती आहे. अपमानास्पद वागणूक मिळते. प्रोत्साहन रकमेतील कपात होते. अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कामगाराचा दर्जा द्यावा. किमान २६ हजार रुपये मासिक वेतन द्यावे. ईएसआयसी, ईपीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन, सामाजिक सुरक्षा द्यावी. नियमितीकरण करावे. सहा महिन्यांची सवेतन प्रसूती रजा द्यावी. पदोन्नती धोरण लागू करावे. प्रवास भत्ता द्यावा. स्कूटर सुविधा द्यावी. डिजिटल कामासाठी टॅबलेट व डेटा सुविधा द्यावी. अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुभाष पांडे, कोषाध्यक्ष कॉ. राजेंद्र भांबोरे, जिल्हा सचिव कॉ. वंदना बुरांडे, ज्योती नालट, किरण रंगारी, ममता काळे, उषा कुऱ्हाडे, संगीता अवताळे, अश्विनी लोखंडे, कविता बेलसरे, श्वेता सावरकर, गायत्री बेलसरे, दुर्गा वासनिक आदींसह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ६ ऑक्टोबरला दिल्लीत मोर्चा अलिकडच्या काळात या मागण्या मान्य न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीच्या सेविका-मदतनीस व मध्यान्ह भोजन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. ४ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मिशन स्टिअरिंग ग्रुपच्या बैठकीत आशा सेविकांचे निश्चित मानधन २ हजार रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये करण्याचा निर्णय झाला होता. १० वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या आशा सेविकांना २० हजार ऐवजी ५० हजार रुपये देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.
Source link
कमी मानधन, कामाचा ताण; आशा सेविकांचा तीव्र इशारा:मनपाच्या आरोग्य केंद्रासमोर केली जोरदार निदर्शने