Headlines

परिसरात साचते पाणी; आवार भिंतही पडली:पालक शाळा व्यवस्थापन समितीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा




चोहोट्टा बाजारजवळ असलेल्या रेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची दुरवस्था झाली आहे. रखडलेले वर्गखोलीचे बांधकाम, कोसळलेली संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात साचलेले पावसाचे पाणी आदींविरोधात संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कामात घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बीडीओंच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे शाळेच्या संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसर अक्षरशः डबक्यात बदलला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शाळेची संरक्षण भिंत कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या परिसरात वाढलेल्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. ही भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच उपअभियंता (जि.प. बांधकाम उपविभाग) यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन घुगरे, मोहन कपले, महादेव धमके, गजानन लोणकर, विलास लोणकर, सुरेश अघडते, हरिदास अघडते, रमेश अघडते, आरती धमके, कल्पना लोणकर, शुभांगी ढेगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ..तर आंदोलन करणार शाळेच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आली आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेली कामे पूर्ण करावीत. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.- मोहन कपले, ग्रामस्थ उपाययोजना कराव्यात शाळेचा प्रश्न ऐरणीवर आहे. शाळेच्या आवारात साचलेले पाणी, कोसळलेली संरक्षण भिंत, रखडलेले बांधकाम यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. प्रशासनाने सर्व समस्या सोडवाव्यात. – मोहन घुगरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *