![]()
निवडणूक तोंडावर असताना सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक अटी लागू करून महिलांना या योजनेतून वगळण्याचे पाप करत आहे. या योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली असून, आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे लोक जेव्हा या महिलांकडे मतदान मागायला जातील, तेव्हा महिला त्यांना नक्कीच जाब विचारतील, असा थेट इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच, सरकारच्या तिजोरीत पैसे नसून, मोक्याच्या सरकारी जमिनी कवडीमोल भावाने उद्योजकांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत इतक्या अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत की, तिचा लाभ केवळ 12 ते 15 लाख शेतकऱ्यांनाच होणार आहे. या निकषांमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असून, सामान्य शेतकऱ्यांना जो त्रास व्हायचा तो होणारच आहे. जर केवळ मोजक्याच लोकांना याचा फायदा होणार असेल, तर सरकार याला ‘सरसकट कर्जमाफी’ कसे काय म्हणू शकते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कर्जमाफीतून बाद करण्याचा कट विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे लोक आयकर भरतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांकडून ‘फॉर्म नंबर 16’ भरून घेतला जातो. वास्तविक पाहता कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे देखील हा फॉर्म भरतात, परंतु त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न काहीच नसते. अशा लाखो गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक कारणे दाखवून कर्जमाफीतून बाद करण्याचा कट सरकारने रचला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात अत्यंत चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्यात अंतर्गत पातळीवर नेमके काय शिजत आहे. विधान परिषदेला दराडे का पडले याचे खरे कारण केवळ त्यांनाच ठाऊक असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Source link
निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार