Headlines

गीता मालुसरेने इंग्लिश चॅनेल यशस्वीरित्या पार केले:11 शस्त्रक्रिया अन् शारीरिक वेदनांवर मात करत रचला इतिहास




मुळशीची ‘जलपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीता दिपा महेश मालुसरे हिने जागतिक जलतरण क्षेत्रात नवा विक्रम रचला आहे. तिने अत्यंत खडतर मानली जाणारी ‘इंग्लिश खाडी’ (इंग्लिश चॅनेल) यशस्वीरीत्या पार केली. समुद्रातील वेगवान लाटांमुळे मूळ 35 किलोमीटरचे अंतर प्रत्यक्ष पोहताना तब्बल 54 किलोमीटर झाले होते, जे तिने 14 तास 31 मिनिटांत पूर्ण केले. गीताचा हा प्रवास संघर्षमय असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहण्यास सुरुवात केलेल्या गीताने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2017 मध्ये, तिच्या 13 व्या वाढदिवशी तिने मुंबईच्या समुद्रात 32 किलोमीटरचे अंतर केवळ 6 तास 26 मिनिटांत पार करण्याचा विक्रम नोंदवला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला ‘जेलीफिश’ या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. यामुळे तिचा हात पूर्णपणे निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. एका वर्षात तिच्या हातावर तब्बल 11 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, ज्यामुळे तिचे जलतरण करिअर संपुष्टात आले असे अनेकांना वाटले होते. मात्र, जिद्दी गीताने हार मानली नाही. गेल्या वर्षभरात तिने दररोज 8 ते 10 तास अत्यंत खडतर सराव केला. हातातील जखमा ओल्या असताना आणि सराव करताना रक्त येत असतानाही ती थांबली नाही. इंग्लिश खाडीत पोहत असताना जुन्या जखमांमुळे तिला असह्य वेदना होत होत्या, पण तिने सर्व त्रासाकडे दुर्लक्ष करत आपले लक्ष ध्येयावर केंद्रित केले. आता गीताचे पुढील ध्येय ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळवणे आहे. यासाठी तिला जगातील सात प्रमुख खाड्या पोहायच्या आहेत. इंग्लिश खाडी पार करून तिने या मोहिमेची यशस्वी सुरुवात केली आहे. या वर्षात सप्टेंबरमध्ये ती कॅलिफोर्नियातील ‘कॅटेलीना चॅनेल’ (32 किमी) आणि 1 ऑक्टोबरला न्यूयॉर्कमधील ‘ट्वेंटी ब्रीजेस’ (46 किमी) स्पर्धा पार करणार आहे. गीता सध्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि प्रतीक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *