![]()
नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घातली असली, तरी नागपुरात हे आदेश धुडकावत डीजेच्या दणदणाटात दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याचे समोर आले आहे. बडकस चौकात ‘बडकस चौक मित्र परिवार’तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात पोलिसांच्या सूचनेनंतरही डीजे आणि तीव्र लाईट्सचा वापर करत गोविंदा पथकांकडून थर रचण्यास सुरुवात झाली. या मंडळाने सकाळपासूनच डीजे लावण्याची ठाम भूमिका घेतली होती. त्यानुसार संध्याकाळी दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्ष डीजे सुरू करण्यात आला. डीजेचा आवाज नेहमीपेक्षा काही अंशी कमी असला, तरी त्याचा दणदणाट सुरूच होता. विशेष म्हणजे, पोलीस या ठिकाणी उपस्थित असून ते आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवून आहेत. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी 80 ते 82 डेसिबल आवाजाची नोंद केली असून, बंदीचा आदेश उघडपणे झुगारणाऱ्यांवर पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंदीवरून भाजप नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह पोलिस आयुक्तांच्या या डीजे बंदीच्या आदेशावरून भाजप नेत्यांमधूनच दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या बंदीला तीव्र विरोध दर्शवला आहे. नेहमी हिंदूंच्या सणांच्या वेळीच डीजेवर बंदी का घातली जाते? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी हा बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. संदीप जोशींची कायमस्वरूपी बंदीची मागणी दुसरीकडे, भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजे बंदी केवळ दोन महिन्यांपुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे. आपली ही मागणी वैयक्तिक असली तरी ती सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या हिताची व लोकभावनेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 20 ते 25 मंडळांचे डीजे न लावण्याचे हमीपत्र डीजे बंदीच्या या निर्णयाला अनेक नागरिकांकडून आणि समाजातूनही पाठिंबा मिळत असल्याचा दावा संदीप जोशी यांनी केला आहे. अनेकांनी आपल्याला यासंदर्भात लेखी समर्थन दिल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातील जवळपास 20 ते 25 सार्वजनिक मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेत यापुढे आम्ही उत्सवांमध्ये डीजेचा वापर करणार नाही, असे हमीपत्राद्वारे लिहून दिले असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे.
Source link
नागपुरात डीजे बंदीचे आदेश धाब्यावर:बडकस चौकात दणदणाटात दहीहंडी साजरी, पोलिसांच्या उपस्थितीतच नियमांचे उल्लंघन