Headlines

कृषी विभागाची मोफत 'डिजिटल शेतीशाळा':शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आधुनिक शेतीचे धडे




बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आधुनिक शेतीचे धडे दिले जाणार आहेत. राज्यात शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वेळा पिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. मात्र अनेक वेळा शेतकऱ्यांना तातडीची माहिती मिळणे कठीण होत असल्याने या डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात आल्या आहे. या उपक्रमांतर्गत राहुरी, परभणी, दापोली आणि अकोला कृषी विद्यापीठांतील नामवंत कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना ऑनलाईन (Zoom आणि YouTube च्या माध्यमातून) मार्गदर्शन करणार आहेत. अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड अशा प्रतिकूल हवामानात पिके वाचवण्याचे तंत्रज्ञान, जीवामृतासारख्या जैविक निविष्ठांची निर्मिती आणि रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबाबत थेट प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या लाईव्ह सत्रादरम्यान शेतकरी शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे जागेवरच निरसन करून घेऊ शकणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सदर शेतीशाळा पूर्णपणे मोफत असून, सोमवार ते शनिवार दररोज विविध पिकांसाठी झूमवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी, कापूस, भुईमूग, भात, राजमा, मका, नाचणी, तूर-मूग-उडीद आणि भाजीपाला या प्रमुख पिकांवर संध्याकाळी ६.१५ आणि ७.३० वाजता तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या माध्यमातून झूम ॲपद्वारे (ID व Passcode वापरून) या सत्रात सहभागी होऊ शकतात. तसेच, ‘कृषी विभाग महाराष्ट्र शासन’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ च्या अधिकृत युट्यूब व फेसबुक चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती किफायतशीर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *