Headlines

दिलीप कुमार यांनी खेडमधील जलसंधारण कामांची पाहणी केली:गावे जलसुरक्षित करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन; 76 दुष्काळी तालुक्यांतील कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश




केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमिसंसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार यांनी खेड तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी केली. पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवावे आणि गावे जलसुरक्षित व स्वयंपूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले. जलसंधारणाच्या कामांची नियमित देखभाल करून त्यांचा दीर्घकाळ उपयोग व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी, असेही कुमार म्हणाले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत वरुडे, गुलाणी आणि वाफगाव येथे सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ, शेतकरी, लाभार्थी आणि जलसंधारण समित्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत जलसंधारणाच्या तत्त्वानुसार उभारलेले सलग समतल चर, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि जलसाठा तलाव त्यांनी पाहिले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे, भूजल पुनर्भरण वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे यांचा त्यांनी आढावा घेतला. खेड प्रकल्पातील ११ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षातून दोन ते तीन पिके घेणे शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेततळी आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठ्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीतही उभ्या पिकांना पाणी देता येत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील योजनेत समाविष्ट ७६ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पाझर तलाव, साठवण तलाव आणि बंधाऱ्यांच्या कामांना प्राधान्य देऊन पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यास त्यांनी सांगितले. पुण्यातील यशदा येथे कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यात योजनेच्या आर्थिक आणि प्रत्यक्ष कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, कामांचा दर्जा राखणे आणि केंद्र-राज्य समन्वय मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *