![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी काळात पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा करत शिंदे सेनेवर तोफ डागणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शिवसेना (शिंदे गट) नेते तथा आमदार निलेश राणे यांनी थेट संपत्ती पणाला लावण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. “भविष्यवाणी सांगून महाराष्ट्र चालत नाही. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत तर मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी सोडून देईन, असा स्टॅम्प पेपरवर करार करून लिहून देण्याचे धाडस गुणरत्न सदावर्ते दाखवणार का?” असा थेट सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. या अटीतटीच्या आव्हानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सदावर्ते हे आव्हान स्वीकारतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना आमदार निलेश राणे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार राजकीय हल्ले चढवले. सदावर्तेंनी प्रॉपर्टी सोडून देण्याचा करार लिहून द्यावा! गुणरत्न सदावर्ते यांच्या दाव्यांची खिल्ली उडवत निलेश राणे म्हणाले, “2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी धाडसी उठाव केला, तेव्हाही राज्यातील अनेक तथाकथित राजकीय ज्योतिषी आणि पंडित म्हणायचे की शिंदे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र त्यांनी सर्व अंदाज खोटे ठरवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे भूषवून दाखवले.” शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष “आज आमच्या शिवसेनेकडे (शिंदे गट) खासदार, डझनभर आमदार आणि राज्यभरात शेकडो नगरसेवक आहेत. महाराष्ट्र विधानसभेत आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष आहे. अशा ताकदीचा नेता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही तर कोण होणार?” थेट प्रॉपर्टी पणाला लावण्याचे आव्हान “सदावर्ते जर छातीठोकपणे सांगत असतील की शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, तर त्यांनी कागदावर लिहून द्यावे की ‘शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर मी माझी सर्व प्रॉपर्टी सोडून देईन’. मग आम्हीही आमची सगळी प्रॉपर्टी सोडून देण्याचे आव्हान स्वीकारतो. उगाच माध्यमांसमोर भपकेबाज भाषणे करून स्वतःचे हसे करून घेऊ नये.” शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा राज्यातील सत्तासमीकरणांवर आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “देवेंद्र फडणवीस हे निश्चितच अत्यंत वरिष्ठ आणि राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते आहेत. ते माझेही नेते आहेत. मात्र एक सामान्य कार्यकर्ता आणि कडवट शिवसैनिक म्हणून माझी व्यक्तिगत व तीव्र इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. त्यांनी अडीच वर्षांत सामान्य जनतेसाठी केलेले काम अद्वितीय आहे आणि त्यांना पुन्हा एकदा त्याच सर्वोच्च पदावर पाहणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे.” राज ठाकरेंचा ‘फार मोठा’ पक्ष ‘देवेंद्र फडणवीस यांना 2029 पर्यंत महाराष्ट्रातच ठेवा’ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना निलेश राणे यांनी बोचरा चिमटा काढला. “राज ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत! त्यांचा पक्ष प्रचंड मोठा आहे. त्यांच्याकडे शेकडो आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून आलेले आहेत. इतर राज्यांतही त्यांची संघटना खूप मोठी आहे! त्यामुळे एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्याने केलेली भविष्यवाणी खरी मानायची की नाही, याचा विचार आता महाराष्ट्रानेच करावा,” अशा शेलक्या शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या राजकीय ताकदीवर बोट ठेवले. मविआची मंडळी रिकामटेकडी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जाहीर केलेल्या आंदोलनावर बोलताना निलेश राणे यांनी ठाकरे गटाची पोलखोल केली. “निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची संकल्पना मुळात उद्धव ठाकरेंची किंवा त्यांच्या पक्षाची नाहीच. ही आयडिया मूळ कार्यकर्त्यांची म्हणजे अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची आहे. ठाकरेंनी केवळ ही आयडिया चोरून स्वतःचे आंदोलन म्हणून पुढे रेटले आहे.” हाताला काम नसलेली टोळी “निवडणुकांमध्ये मतदारांनी नाकारल्यामुळे आता ठाकरे गटाकडे काहीही काम उरलेले नाही. ही सर्व मंडळी पूर्णपणे रिकामटेकडी झाली असून रोज उठून प्रसिद्धीसाठी नौटंकी करत आहेत,” असा घणाघात निलेश राणे यांनी शेवटी केला. ———————————————————————- हेही वाचा… देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला? “पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर संपूर्ण प्रॉपर्टी सोडून देतो!:सदावर्तेंनी असं लिहून देण्याचं धाडस दाखवावं, निलेश राणेंचे थेट आव्हान