Headlines

धंगेकरांचा पोलिस महासंचालक कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा:राणा सूर्यवंशीवरील कथित हल्ल्याप्रकरणी आठ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्याचा सवाल




बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ला त्यानेच घडवून आणल्याचा आरोप शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला. आठ दिवस उलटूनही गुन्हा का दाखल झाला नाही आणि सूर्यवंशीला विशेष सुरक्षा कोणी दिली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सरकारने उत्तरे न दिल्यास पोलिस महासंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला. धंगेकर म्हणाले, “मी या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडली आहे. माझ्यावर कोणी टीका केली, तरी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. हल्ल्यात वापरलेली रिव्हॉल्व्हर कुठून आली, याचा तपास झाला पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “बनावट चकमकीचे प्रकरण समोर आले असताना संबंधित व्यक्ती मोकाट कशी फिरते? पोलिस महासंचालक या प्रकरणाचा तपास करत नसतील, तर गृहखाते आणि मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत?” सूर्यवंशीचे व्यवसाय काय आहेत आणि त्याने गडचिरोलीतील जमिनी कशा हस्तगत केल्या, याची चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी केली. कथित आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या आरोपांचीही चौकशी व्हावी, असे ते म्हणाले. सूर्यवंशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ कसा पोहोचला आणि त्याला मदत करणारे कोण आहेत, याचा तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असेही धंगेकर म्हणाले. “सत्तेत बसलेल्या लोकांनाच आम्ही जाब विचारणार आहोत. मी शिवसैनिक म्हणून हे प्रश्न उपस्थित करत आहे,” असे सांगत त्यांनी सूर्यवंशीला तुरुंगात टाकण्याची मागणी केली. दरम्यान, भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या दिल्ली दौऱ्यातील शिबिराचे धंगेकर यांनी स्वागत केले. मित्रपक्षाने काम केले की नाही, याचे उत्तर एकनाथ शिंदे देतील; मात्र भाजपच्या नेत्यांनी काय काम केले, याचाही जाब दिला पाहिजे, असे ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत नंतर भूमिका मांडू, असेही धंगेकर यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *