“एकाच घरात दोन भाऊ एकत्र राहत असताना त्यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात, मात्र मतभेद असले तरी मनभेद नसतात. महायुतीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये किंवा नेत्यांमध्ये विशिष्ट विषयावरून झालेला वाद म्हणजे थेट भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील
.
आज 31 ऑक्टोबर 2026 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी महायुतीतील समन्वयावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विधान परिषद निकालांचे अंतर्गत विश्लेषण, राहुल गांधींचे राजकारण, नाशिक कुंभमेळ्यावरील विरोधकांचे आक्षेप आणि महाराष्ट्राच्या आर्थिक उद्दिष्टांवर सविस्तर भाष्य केले.
दोन भावांमध्ये मतभेद होतात, पण मनभेद नाहीत; महायुती भक्कम
भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यात उफाळलेल्या शाब्दिक वादावर विचारले असता अमित साटम म्हणाले, “एखाद्या विशिष्ट विषयावर दोन नेत्यांची किंवा व्यक्तींची मते वेगळी असू शकतात. याचा अर्थ दोन पक्षांमध्ये युद्ध पेटले आहे असा होत नाही. प्रसाद लाड-रामदास कदम किंवा निलेश राणे-नवनाथ बन यांच्यातील संवाद हा वैयक्तिक पातळीवरील मतभेदांचा भाग असू शकतो. त्याला दोन पक्षांमधील दरी म्हणणे चुकीचे आहे.”
एकनाथ शिंदेंना पत्र दिल्याची बातमी खोटी
“शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी विधानपरिषद निवडणुकीत विरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई करावी, असे कोणतेही पत्र मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले नाही. या केवळ माध्यमांतील वावड्या आहेत. ठाण्यातील घटना असो वा संजय गायकवाड यांचे विधान, यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचा विरोधकांचा दावा फोल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिन्ही नेते राज्याला विकासाच्या मार्गावर ‘न्यूमेरो उनो’ (क्रमांक 1) बनवण्यासाठी भक्कमपणे एकत्र काम करत आहेत.”
2029 पर्यंत भारत 5 ट्रिलियन, तर महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार!
राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आराखडा मांडताना साटम यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “2029 मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठेल, तेव्हा एकट्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची झालेली असेल. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीला आणि धोरणांना जाते.”
निवडणुकीतील जागांची कारणमीमांसा करणार
“लोकशाहीत निवडणुकीचे निकाल थोडेफार वर-खाली होत असतात, हा सत्ताकारणाचा भाग आहे. विधानपरिषदेत 1 ते 2 जागांवर निकाल अपेक्षेप्रमाणे का आले नाहीत, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कुठे कमी पडलो, याचे संघटनात्मक ऑडिट नक्की केले जाईल. मात्र, याचा महायुतीच्या स्थैर्यावर काडीचाही परिणाम होणार नाही.”
राहुल गांधी देशात अराजकता माजवतायत
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसवर घणाघात करताना ते म्हणाले, “1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी 565 संस्थानांचे विलीनीकरण करून आजचा अखंड आणि एकात्म भारत उभा केला. आपण एकत्र आलो नाही तर देश अराजकतेकडे जाईल, असा इशारा त्यांनी तेव्हाच दिला होता.”
79 वर्षांनंतर काँग्रेसचा अराजकतेचा प्रयत्न
“आज 79 वर्षांनंतर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष केवळ सत्ता काबीज करण्यासाठी देशात पुन्हा फूट पाडण्याचा आणि अराजकता माजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा देश काँग्रेसचे हे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला देशाच्या इतिहासातील सर्वात कमी जागा मिळतील आणि जनता त्यांना धडा शिकवेल.”
अक्कल कमी आणि पगार जास्त असणाऱ्यांना उत्तर देणे शासनाला ठाऊक
नाशिक कुंभमेळ्याच्या 35,000 कोटी रुपयांच्या नियोजित खर्चावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेचा साटम यांनी सडकून समाचार घेतला. “विरोधक असा एकही विषय सोडत नाहीत ज्यावर ते ट्वीट करत नाहीत. त्यातही तुम्ही ज्यांचे नाव घेतले, त्यांची अवस्था ‘अक्कल कमी आणि पगार जास्त’ अशी झाली आहे. कुंभमेळा असो वा कर्जतचा पंप स्टोरेज प्लांट, विरोधक रोज रात्री डोके खाजवून नवे विषय काढतात आणि सकाळी ट्वीट करतात.”
सरकारचे हात आणि मन स्वच्छ
“विरोधी पक्षांच्या प्रत्येक शंकेला आणि बिनबुडाच्या आरोपाला चोख उत्तर देण्याची पूर्ण ताकद शासनामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत आणि मनही साफ आहे. शेवटच्या घटकाची प्रामाणिक सेवा करण्याचे काम हे सरकार अविरतपणे करत राहील.”
—————————————————————
हेही वाचा…
देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला?

“पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी