![]()
“माझ्यावर 100 कोटी रुपयांचे बिनबुडाचे आरोप झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली 13 महिने सखोल चौकशी झाली होती. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 400 पानांचा सविस्तर अहवाल तब्बल 4 वर्षांपूर्वी राज्य शासनाला सादर केला. मात्र, चार वर्षांत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 15 पत्रे लिहूनही हा अहवाल अद्याप जनतेसमोर आणलेला नाही. त्या अहवालात जर अनिल देशमुखांना फाशी देण्याची शिफारस असेल तर मला फाशी द्या; पण जर आरोप सिद्ध होत नसतील तर सत्य जनतेसमोर येऊ द्या. सरकारकडून काहीही उत्तर न मिळाल्याने अखेर मी राज्यपालांकडे तक्रार केली असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सार्वजनिक करण्याचे थेट निर्देश द्यावेत. आगामी अधिवेशनात अहवाल पटलावर न आल्यास मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल,” असा इशारा माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी दिला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा प्रलंबित अहवाल, नाशिक कुंभमेळ्यातील कथित गैरव्यवहार, विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची झालेली पीछेहाट, नागपूर पदवीधरमधील काँग्रेसचा विजय, शक्तिपीठ महामार्गाचा नाहक खर्च आणि दुष्काळग्रस्तांची झालेली थट्टा यावर सविस्तर भाष्य केले. 400 पानांचा अहवाल चार वर्षे का दाबून ठेवला? चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून राज्य सरकारला धारेवर धरताना देशमुख म्हणाले, “माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून माझ्यावर विरोधकांनी 100 कोटींचा आरोप करायला लावला होता. त्यानंतर मी स्वतः उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 13 महिने कोर्ट चालवून तब्बल 400 पानांचा अहवाल सादर केला.” उद्धव ठाकरेंना वेळ मिळाला नाही “अहवाल आला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हे खरे आहे, मात्र अहवाल सादर झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसांत ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे त्यांना तो सार्वजनिक करता आला नाही. मात्र, विद्यमान सरकार चार वर्षांपासून हा अहवाल दाबून का बसले आहे?” राज्यपालांकडे धाव, न्यायालयात जाण्याचा इशारा “मी स्वतः 15 पत्रे फडणवीसांना लिहिली आहेत. तरीही हा अहवाल बाहेर येत नसल्याने जनतेचा पैसा आणि न्यायालयाचा वेळ वाया गेला आहे. राज्यपालांनी फडणवीसांना हा अहवाल जनतेसमोर आणण्याचे निर्देश द्यावेत, अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही.” बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव हा जनतेचा इशारा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांवरून भाजप आणि महायुतीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. “पाचपैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला, तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) लढवलेल्या दोन्ही जागा जिंकल्या. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) कर्मभूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे शहर आहे. तिथे महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवाराचा विजय होणे हा जनतेने सत्ताधाऱ्यांना दिलेला थेट इशारा आहे.” महायुतीत समन्वयाचा अभाव, लोकांचे मनोरंजन “गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. ‘आमचा उमेदवार भाजपने पाडला’ असे शिंदे सेनेला वाटते, तर ‘आमचा उमेदवार शिंदेंनी पाडला’ असे भाजपला वाटते. सत्तेत असूनही यांच्यात ताळमेळ नाही, केवळ पदाधिकाऱ्यांची आपापसात भांडणे सुरू असून जनतेचे फुकट मनोरंजन होत आहे.” नीतेश कराळेंना मिळालेली 24,000 मते मविआच्याच विचारांची नागपूर पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार नीतेश कराळे यांच्या भूमिकेवर बोलताना देशमुखांनी वस्तुस्थिती मांडली. “नागपूर पदवीधर मतदारसंघ हा मविआच्या जागावाटपात काँग्रेसचे सिटिंग आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडे गेला. आम्ही पक्षाच्या वतीने शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कराळे गुरुजींना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र समर्थकांच्या आग्रहामुळे त्यांनी अपक्ष लढत दिली.” मविआच्या मतांचा आधार “कराळे गुरुजींना मिळालेली 24,000 मते ही भाजपविरोधी आणि महाविकास आघाडीच्याच विचारांची मते होती. पहिल्या पसंतीत त्यांना मते मिळाली तरी दुसऱ्या पसंतीची तब्बल 80 टक्के मते वंजारी यांना पडली आणि त्यामुळेच काँग्रेसचा विजय अधिक सुकर झाला. कराळेंवरील पक्षांतर्गत कारवाईबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल.” सोशल मीडियावर 99% रोष भाजपविरोधात नागपुरात भाजप नेत्यांकडून नियोजित मोर्च्यावर बोलताना त्यांनी सल्ला दिला. “भाजपच्या नेत्यांनी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर जाऊन जनतेचा सूर पाहावा. तिथे 99 टक्के प्रतिक्रिया या भाजपच्या धोरणांविरुद्ध आहेत. जनतेत तीव्र आक्रोश असताना विरोधी पक्षांविरोधात मोर्चे काढण्याचा हास्यास्पद प्रकार भाजपने थांबवावा.” नाशिक कुंभमेळ्यातील कामांची चौकशी करा कुंभमेळा खर्च आणि दुष्काळी परिस्थितीवर देशमुख यांनी सरकारला घेरले. “नाशिक कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च होत असताना तेथील कामे निकृष्ट दर्जाची झाली असून वारंवार अपघात घडत आहेत. स्थानिक नाशिककरच भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याने राज्य सरकारने या संपूर्ण खर्चाची निष्पक्ष चौकशी करावी.” शक्तिपीठ महामार्ग रद्द करा “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 5,000 रुपये देऊन शासनाने त्यांची क्रूर थट्टा केली आहे. ज्या शक्तिपीठ महामार्गाची कोणालाही गरज नाही आणि ज्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, त्या प्रकल्पाचा कोट्यवधींचा खर्च तत्काळ रद्द करावा आणि तो सर्व निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून द्यावा.” ————————————————————– हेही वाचा… कराळेंनी घेतलेली मते भाजपची नव्हती!: पण त्यांना एवढी मते कशी मिळाली याचे आत्मचिंतन करू; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचे मोठे वक्तव्य “नागपूर पदवीधर मतदारसंघातील जागा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्या निवडणुकीत पराभव झाला हे वास्तव असून ते स्वीकारले पाहिजे. अपक्ष उमेदवार नीतेश कराळे यांनी घेतलेली मते ही निश्चितपणे भाजपची पारंपरिक मते नव्हती, तर भाजपला न मिळणारी मते त्यांना मिळाली. मात्र, तरीही कराळेंना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते कशी मिळाली, याची दखल पक्षाने घेतली असून पराभवाच्या कारणांचे सखोल व गंभीर आत्मचिंतन केले जाईल. भविष्यात या चुका दुरुस्त करूनच पक्ष पुढील निवडणुकांना सामोरा जाईल,” अशी रोखठोक कबुली राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर येथे दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
दोषी असेन तर फाशी द्या, नाहीतर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा!:चार वर्षांत 15 पत्रे लिहूनही फडणवीस गप्प का? अनिल देशमुखांची थेट राज्यपालांकडे धाव