![]()
उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) डेटा सेंटर आणि ऊर्जा प्रकल्पावरून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवून उजनीच्या जीवावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाविरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते आणि हजारो शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. “गुजरातला पाणी पिणारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प नकोत म्हणून ते महाराष्ट्रावर लादायचे का? आज आम्ही केवळ आंदोलनाचा ट्रेलर दाखवला आहे. सरकारने हा प्रकल्प तत्काळ रद्द केला नाही, तर कायमस्वरूपी महामार्ग रोखून धरू,” असा सज्जड इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. दुसरीकडे, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सत्ताधारी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत जनसमर्थन आंदोलन करण्यात आल्याने या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक थेट आमनेसामने आले आहेत. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून २८ मुद्द्यांवर खुलासा केला असला, तरी रोहित पवार यांनी तो खुलासा थेट खोडून काढत शासकीय आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केला आहे. अधिकृत सामंजस्य करारात न्यूक्लिअर प्लांटचा स्पष्ट उल्लेख जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रसिद्ध केलेल्या 28 मुद्द्यांच्या खुलाशावर रोहित पवार यांनी थेट टीकास्त्र सोडले. “जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की उजनीवर ग्रीन हायड्रोजन किंवा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (न्यूक्लिअर प्रकल्प) होणार नाही. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेल्या आणि शासनाने केलेल्या अधिकृत सामंजस्य करारात (MoU) न्यूक्लिअर प्लांटचा स्पष्ट उल्लेख आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगावे की मुख्यमंत्री आणि शासन खोटे बोलत आहे.” पाणी वापराचा फसवा आकडा “प्रशासनाकडून केवळ 0.5 टीएमसी (TMC) पाणी लागेल असा दावा केला जात आहे, हा निव्वळ डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. जर पाणी कमी लागणार होते तर मग हा प्रकल्प उजनी धरणाच्या उशाला आणण्याचे कारणच काय होते? पाईपलाईनने पाणी मोजून बिलिंग करणार याचाच अर्थ मोठ्या पाईपलाईन टाकून धरणातील पाणी उपसले जाणार आहे.” 3000 मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे उजनीतील जैवविविधता, मासेमारी आणि परिसंस्थेला मोठा धोका पोहोचणार असून प्रदूषणमुक्त असल्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. रोजगार अवघ्या 400 जणांना अन् वीज संपूर्ण जिल्ह्याएवढी? प्रकल्पाच्या आर्थिक आणि रोजगाराच्या समीकरणावर बोलताना त्यांनी सडकून टीका केली. “एवढा महाकाय प्रकल्प उभा करून स्थानिक तरुणांच्या पदरात काय पडणार? या संपूर्ण डेटा सेंटरमधून जास्तीत जास्त 400 जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पाण्याचा बळी घेतला जात आहे.” लोडशेडिंगचे भीषण संकट “सोलापूर जिल्ह्याला वर्षभरात जितकी वीज लागते, तितकी वीज हा एकटा प्रकल्प फस्त करणार आहे. सध्याच ग्रामीण भागात भीषण लोडशेडिंग सुरू असताना, हा प्रकल्प आल्यावर शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीज कशी मिळणार? या प्रकल्पातून सामान्य शेतकरी देशोधडीला लागेल आणि केवळ सत्ताधारी नेते व उद्योगपतींचे खिसे भरतील.” चांगल्या प्रकल्पांचे स्वागतच “आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. सरकारने सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सेमीकंडक्टरचा प्लांट आणावा, भव्य आयटी पार्क उभे करावे किंवा ऑटोमोबाईल हब उभारावे, आम्ही त्याचे जाहीर स्वागत करू. मात्र पाण्याचा घास घेणारे डेटा सेंटर आम्ही उजनीवर होऊ देणार नाही.” आंदोलनाला सर्वपक्षीय बळ; मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे मंचावर शेतकऱ्यांच्या या लढ्याला राजकीय सीमा ओलांडून सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. आंदोलनाच्या व्यासपीठावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार संजयमामा शिंदे, तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले प्रताप पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “असाच एक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे आमदार प्रताप पाटील हेसुद्धा या लढ्यात सहभागी झाले असून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणार आहोत,” असे पवार म्हणाले. आम्ही लोकांशी बांधील, चापलुसी करणाऱ्यांशी आमचे देणेघेणे नाही सोलापुरात भाजपने काढलेल्या समर्थन रॅलीवर आणि राजेंद्र राऊत यांच्या टीकेवर रोहित पवारांनी उत्तर दिले. “भाजपच्या नेत्यांना सत्तेची आणि मुख्यमंत्र्यांची चापलुसी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. आमची बांधिलकी मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांशी, शेतमजुरांशी आणि सामान्य नागरिकांशी आहे. जनतेचा रोष या प्रकल्पाविरोधात असल्याने हे व्यासपीठ पूर्णपणे अराजकीय आहे.” टीकेला पाचवीतला प्रवक्ता उत्तर देईल “माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आमच्या पक्षाचा पाचवीतला प्रवक्ताही पुरेसा आहे. ज्यांना उद्योग, रोजगार आणि अर्थशास्त्र समजते त्यांच्याशीच मी संवाद साधतो,” असा टोला त्यांनी लगावला. उजनीच्या पाण्यासाठी पेटलेला हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, सरकारने हा प्रकल्प मागे न घेतल्यास आगामी काळात सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत बंद करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे. —————————————————— हेही वाचा… देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला? “पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
गुजरातला पाणी पिणारे प्रकल्प नकोत म्हणून ते उजनीवर लादणार का?:रोहित पवार शेतकऱ्यांसह रस्त्यावर; म्हणाले- प्रकल्प रद्द न केल्यास महामार्ग बेमुदत बंद करू