![]()
भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी मीरा-रोड येथे प्रस्तावित असलेल्या संगीत विद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असताना, सत्ताधारी भाजपने प्रशासकीय वळण देत या वास्तूचे रूपांतर ‘महापौर निवासात’ करण्याचा धडाका लावला आहे. महासभेत या संदर्भातील मंजुरीचा ठराव पदरात पाडून घेतल्यानंतर स्थानिक राजकारणात जोरदार गदारोळ सुरू झाला असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाविरोधात थेट शड्डू ठोकले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, महापालिकेच्या शाळेला लागून असलेल्या क्रीडांगणाच्या १५% भूखंडावर २५ कोटी रुपये खर्चून भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल साकारले जात आहे. या प्रकल्पाचे जवळपास ७०% बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू होती. मात्र, अचानक सत्ताधारी भाजपने संगीत विद्यालयाचा प्रस्ताव धाब्यावर बसवत, पूर्ण होत आलेल्या याच इमारतीचा ताबा महापौर निवासासाठी घेण्याचा घाट घातल्याचे समजते. शहर अभियंता दीपक खांबित यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत महासभेच्या या धक्कादायक ठरावाची माहिती दिल्यानंतर सरनाईक यांचा पारा चढला. भारतरत्न लतादीदींच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या कलादालनाचा असा अनादर करणे अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या या भूमिकेचा कडक शब्दांत निषेध केला. “शहरात आधीपासूनच अधिकृत महापौर निवास उपलब्ध असताना, संगीत गुरुकुलाचा बळी देऊन दुसरं निवासस्थान कशासाठी हवंय?” असा थेट सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला. दरम्यान, लतादीदींच्या स्मृतींना तडा देणारा हा मनमानी निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्वतः हस्तक्षेप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा कडक सूचनाही मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयामुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source link
महायुतीत पुन्हा वाद:लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या जागी महापौर निवास?; भाजपच्या निर्णयावर शिवसेनेचे प्रताप सरनाईक आक्रमक