![]()
पीक कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल तीन महिने बँकेच्या चकरा माराव्या लागल्या, मात्र तरीही कर्ज मंजूर झाले नाही. बँकेच्या या विलंबामुळे मानसिकदृष्ट्या हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. मात्र, प्रसंगावधान राखत उपस्थित खातेदारांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले. बोरिस येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बँकेच्या कामकाजावर खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे. तीन महिने बँकेत चकरा, कर्ज मात्र मिळेना चिंचवार येथील 44 वर्षीय शेतकरी हिरालाल उत्तम माळी यांनी पीक कर्ज मिळावे यासाठी बोरिस येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अर्ज केला होता. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही त्यांनी बँकेत सादर केली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचा आरोप आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते सातत्याने बँकेत जाऊन कर्ज मंजुरीसाठी पाठपुरावा करत होते. प्रत्येक वेळी कर्ज मिळण्याच्या अपेक्षेने बँकेत जाणाऱ्या माळी यांच्या पदरी मात्र निराशाच पडत होती. शेतीच्या हंगामात पीक कर्जाची गरज असताना बँकेकडून होणाऱ्या विलंबामुळे त्यांची अडचण वाढत गेली. वारंवार विनंती करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर ते हतबल झाले. याच संतापातून त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावरच टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. खातेदारांनी वेळीच हस्तक्षेप केला; मोठा अनर्थ टळला बँकेच्या प्रवेशद्वारावर हिरालाल माळी यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच बँकेत उपस्थित असलेल्या बुरझड, निकुंबे आणि बोरिस येथील खातेदारांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून माळी यांना रोखले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर बँकेच्या परिसरात मोठी गर्दी झाली. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागत असतील आणि तीन महिने कागदपत्रे देऊनही कर्ज मिळत नसेल, तर बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची भावना खातेदारांनी व्यक्त केली. तसेच संबंधित बँक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा माळी यांनी दिला दाखला या घटनेनंतर हिरालाल माळी यांनी आपली व्यथा मांडताना राज्य सरकार आणि बँक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत भूमिका मांडली होती. तसेच जुन्या कर्जाचा बोजा कमी करण्याबाबतही आश्वासन दिले होते. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “माझं काही चुकीचं असेल तर बँकेतील सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटिंग तपासा. माझ्यावर कारवाई करा, मी त्यासाठी तयार आहे. मात्र, बँकेची चूक असेल तर शासनाने संबंधितांवर कारवाई करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा कमी करण्याची आणि नवीन कर्ज देण्याबाबत बँकांना सांगितल्याची भूमिका मांडली होती. मग बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज का देत नाहीत? सर्वसामान्य जनतेला एवढा त्रास का सहन करावा लागत आहे?” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. बँक प्रशासनावर कारवाई होणार का? दरम्यान, या घटनेमुळे पीक कर्ज वितरणातील विलंबाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीच्या कामांसाठी वेळेवर आर्थिक मदत मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत कर्जासाठी तीन महिने बँकेच्या चकरा मारूनही पदरी निराशा येत असेल, तर शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आणि मानसिक अडचणींची तीव्रता लक्षात येते. हिरालाल माळी यांच्या आरोपांची चौकशी करून कर्ज मंजुरीला विलंब का झाला, याची कारणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणात बँक प्रशासनाची नेमकी भूमिका काय होती आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता परिसरातील शेतकरी आणि खातेदारांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… सुशील कराडवर विनयभंगाचा गुन्हा दाखल:महिलेचे गंभीर आरोप, परळी पोलिसांवर विश्वास नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याचा मुलगा सुशील कराड याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुशील कराडवर एका महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग करणे आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा….
Source link
पीक कर्जासाठी 3 महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही कर्ज मिळेना:हतबल शेतकऱ्याचा बँकेच्या प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न