![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (१५ नोव्हेंबर) ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’चा प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या मॅरेथॉनमध्ये केनियासह आफ्रिकेतील देशांचे आंतरराष्ट्रीय धावपटू आणि देशभरातील नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. यंदा ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदाच्या दौडीसाठी ‘नशामुक्त युवा-सशक्त युवा-विकसित भारत’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. पाच गटांत स्पर्धा या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. व्यावसायिक धावपटूंसह विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनाही सहभागी होता येणार आहे. विविध गटांतील विजेत्यांना एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यंदा हा आकडा ४० हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे. शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. व्यसनमुक्तीचा संदेश युवकांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडा, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, यासाठी या दौडीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश लोकसहभागातून अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या दौडीत सहभागी होण्यासाठी विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी www.runbuddies.club/puneunityrun या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Source link
अमित शाह 15 नोव्हेंबरला पुणे एकता दौडीचा प्रारंभ करणार:40 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याचा अंदाज; 10 लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके