![]()
उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित संचमान्यता धोरणाविरोधात पुणे येथे गुरुवारी शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा निषेध करत प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी यावेळी सांगितले की, शासनाचा प्रस्तावित संचमान्यता मसुदा अन्यायकारक आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यामुळे शिक्षकांची सेवासुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे संचमान्यतेचे हे अन्यायकारक निकष तातडीने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी कौस्तुभ गावडे यांनी केली. शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांच्या गरजा विचारात घेऊन धोरणात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रस्तावित मसुद्यानुसार, ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा निकष सुचवण्यात आला आहे. यामुळे उपलब्ध तासिकांच्या गणनेत मोठा बदल होऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील एका बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव आहे. याचा थेट परिणाम विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या पदांवर होणार असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले की, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष प्रस्तावित आहे. या निकषामुळे अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता असून, कार्यरत शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब आणि विविध तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या कमी होऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी मांडला. यावेळी संघटनेचे संजय शिंदे, अविनाश बोर्डे, लक्ष्मण रोडे, रविंद्र भदाणे, रवींद्र पाटील, प्रा शिवराम सूर्यवंशी, प्रा डॉ अशोक गव्हाणकर, प्रा दिलीप शितोळे, प्रा मुकुंद आंधळकर, प्रा संतोष फाजगे यांनीही आपले विचार मांडले.
Source link
संचमान्यता धोरणामुळे 8 ते 10 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता:पुणे येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन; अन्यायकारक निकष रद्द करण्याची मागणी