![]()
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी दिंडी क्रमांक ३ चे वाकोडी रोडवरील भोसले लॉन येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पुढाकारातून गेल्या २५ वर्षांपासून दिंडीतील वारकऱ्यांची दोन दिवस सेवा केली जाते. टाळ-मृदुंगाच्या गजरात “माऊली”, “तुकाराम” आणि “विठुराया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या पताका, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावने आणि वारकऱ्यांच्या फुगड्यांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गेल्या १५ वर्षांपासून वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धनही करण्यात येत आहे. यावेळी हभप राहुल महाराज साळुंखे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या अभंगातून वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. त्याच शिकवणीचे आचरण करत गणेश भोसले यांनी हा परिसर हरित व स्वच्छ केला आहे. वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून संतांचा आध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बुरुडगाव परिसरात झालेल्या विकासकामांचेही त्यांनी कौतुक केले. हभप एकनाथ महाराज गोळे म्हणाले, दिंडी गेल्या २५ वर्षांपासून बुरुडगाव परिसरात मुक्काम करत असून राहण्याची उत्तम व्यवस्था, आरोग्य सुविधा, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात. माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, या दिंडीमुळे येथे पंढरपूर अवतरल्याचा भास होतो. वारकऱ्यांच्या माध्यमातून संतविचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे. यावर्षी स्व. मंदाताई भोसले यांच्या वर्षश्राद्धानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांचे संवर्धनही केले जाणार आहे. पुढील वर्षी याच वृक्षांच्या सावलीत वारकरी विश्रांती घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संगीता भोसले, नवनाथ महाराज गांगर्डे, नानासाहेब सानप, हभप शांताराम सानप, सोपान महाराज गोळे, भास्कर महाराज सानप, नाना महाराज सानप, रमेश महाराज खालकर, नामदेव भोसले, सुनील भोसले, संतोष भोसले, विजय फुलसौंदर, संजय कर्डिले यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
Source link
संतांचा आध्यात्मिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज:हभप राहुल महाराज साळुंके यांचे प्रतिपादन, वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण