Headlines

13 हजारांची भाड्याची खोली अन् 30 कोटींचा 'कारभार':अंधेरीत मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, गुजरातचा फरार तस्कर अटकेत




मुंबईतील अंधेरी परिसरात एका अत्यंत साध्या भाड्याच्या खोलीतून चालणाऱ्या कोट्यवधींच्या अंमली पदार्थांच्या काळ्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीत दरमहा २५ ते ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. खार पोलिसांनी गस्तीदरम्यान केलेल्या एका कारवाईतून हे मोठे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणी मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (४४) या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अंधेरीतील सहार रोडवरील भास्कर चाळीत एका छोट्या खोलीत हे ड्रग्स बनवण्याचे कारस्थान सुरू होते. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून आरोपीने हा परिसर निवडला होता. विशेष म्हणजे, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून, येथे तयार होणारे ड्रग्स स्थानिक भागात न विकता बाहेरील नेटवर्कद्वारे सप्लाय केले जात असे. खार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (४४) याच्या संशयास्पद हालचालींमुळे हे मोठे रॅकेट उजेडात आले. त्याच्या झडतीत सुरुवातीला केवळ १५ ग्रॅम ड्रग्स सापडले, मात्र सखोल तपासात थेट ‘फॅक्टरी’च समोर आली. गुजरातमधील फरार आरोपीला अटक या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद आरिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुजरात मधील एका ड्रग्स प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती, परंतु २०२३ मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. मुंबईत ओळख लपवून त्याने पुन्हा आपला काळा व्यवसाय जोमाने सुरू केला होता. पत्नी सांभाळायची आर्थिक हिशोब तपासात असे निष्पन्न झाले की, हे केवळ आरिफचे वैयक्तिक काम नसून एक मोठे नेटवर्क होते. आरिफची पत्नी नसरीन ही या अवैध धंद्यातून येणाऱ्या पैशांचा संपूर्ण हिशोब ठेवायची. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून तिच्या बँक खात्यातील २६ लाख रुपये गोठवले आहेत. या रॅकेटचा दुसरा दुवा रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून पोलिसांनी शोधून काढले आणि अटक केली. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला इतका मोठा ड्रग तस्कर मुंबईच्या मध्यवस्तीत फॅक्टरी थाटून बसतो, यावरून सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या पोलीस या फॅक्टरीला कच्चा माल पुरवणारे आणि तयार ड्रग्स विकत घेणारे इतर एजंट यांचा शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *