Headlines

वणीत लाईन-लेव्हलचा बोजवारा, उघडे पाईप अन् निकृष्ट चेंबरबांधणीने संताप:शाहू महाराजनगरमधील प्रकार; अवघ्या 10 इंची पाईपचा वापर‎




शहरातील शाहू महाराजनगर येथे पेसा अंतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामावर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करूनही अनेक ठिकाणी पाईप उघड्यावर पडलेले असून, चेंबरची उभारणी जुन्या सिमेंटच्या गटारीवरच करण्यात आल्याचा आरोप होत आहे. लाईन-लेव्हल न राखता आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याने या योजनेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अंतर्गत गटारींसाठी केवळ १० इंची पाईप वापरण्यात आले आहेत. परिसराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता अधिक क्षमतेची यंत्रणा उभारणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाअभावी भविष्यात ही व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, जुन्या सिमेंटच्या गटार व्यवस्थेवरच नवीन पाईप टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाईप पूर्णपणे जमिनीखाली गाडण्यात आलेले नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली असून, भविष्यात पुन्हा शासकीय निधी खर्च करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समितीचे अभियंते आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांकडून या कामाची वेळोवेळी तपासणी होणे अपेक्षित असताना उघडपणे दिसणाऱ्या त्रुटींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कामातील प्रमुख त्रुटी • अंतर्गत गटारींसाठी केवळ १० इंची पाईपचा वापर. • भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार नसल्याचा आरोप. • जुनी सिमेंट गटार व्यवस्था कायम ठेवून त्यातच नवीन पाईप टाकल्याची तक्रार. • अनेक ठिकाणी पाईप पूर्णपणे जमिनीखाली न गाडल्याचा दावा. • लाईन-लेव्हल आणि तांत्रिक निकषांचे पालन न झाल्याचा आरोप. • भविष्यात यंत्रणा अपुरी पडून पुन्हा निधी खर्च होण्याची शक्यता. त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्याचे आदेश देऊ ^शाहू महाराजनगरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात येईल. कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व तांत्रिक बाबी तपासल्या जातील. कामात त्रुटी अथवा निकृष्टता आढळल्यास ठेकेदाराला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील. नियमांनुसारच काम पूर्ण करून घेतले जाईल. – संजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी, वणी ग्रामपंचायत तांत्रिक चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करू ^भूमिगत गटाराच्या कामाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. संबंधित ठिकाणी तांत्रिक पथकाकडून पाहणी करण्यात येईल. अंदाजपत्रक, लाईन-लेव्हल, पाईपचा आकार आणि कामाच्या दर्जाची तपासणी केली जाईल. तांत्रिक निकषांचे उल्लंघन आढळल्यास ठेकेदाराला दुरुस्ती करण्यास भाग पाडले जाईल आणि नियमानुसार कारवाई करू. – रवींद्र बाविस्कर, उपअभियंता, दिंडोरी पंचायत समिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *