![]()
आम्ही केवळ मतदार नाही, तर शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक आहोत. अनेक वर्षांपासून शहराची स्वच्छता राखण्यासाठी योगदान देऊनही रोजगाराची शाश्वती नाही, अशी खंत व्यक्त करत स्थानिक कचरा वेचक श्रमिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, अशी मागणी रामवाडी येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. बेंगळुरू येथील ‘हसरू दला’ संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रकल्प) आयोजित करण्यात आलेल्या ‘कष्टकऱ्यांची चहावर चर्चा’ या उपक्रमात शहराच्या विविध भागांतील महिला व पुरुष कचरा वेचकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी हसरू दला संस्थेच्या वतीने कचरा वेचकांच्या सुरक्षिततेसाठी पायलट प्रकल्पांतर्गत २० श्रमिकांना सुरक्षा साहित्याचे (सेफ्टी किट) वितरण करण्यात आले. या बैठकीत कचरा वेचकांच्या सुरक्षिततेसह त्यांचे हक्क, सन्मान आणि रोजगाराच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर मंथन झाले. बैठकीत सुभद्राबाई उल्हारे, अलका उल्हारे यांच्यासह उपस्थित श्रमिकांनी रोजगाराची हमी, सामाजिक सुरक्षा, ओळखपत्र, गणवेश आणि सुरक्षा साहित्य यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता अधोरेखित केली. ‘हसरू दला’ संस्थेने बेंगळुरूमध्ये कचरा वेचकांच्या संघटन आणि सक्षमीकरणासाठी राबविलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. हक्कांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब स्थानिक कचरा वेचकांना रोजगारात योग्य प्राधान्य मिळावे आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरक्षित व्हावा, या उद्देशाने कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व श्रमिकांना अधिक संघटित करण्याचे ठरले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि श्रमाच्या सन्मानासाठी आगामी काळात लोकशाही मार्गाने पुढील भूमिका निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
Source link
कष्टकऱ्यांची चहावर चर्चा:आम्ही केवळ मतदार नाही, शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक; रामवाडीत घुमला कष्टकऱ्यांचा आवाज