Headlines

आशाताईंच्या अंत्यसंस्कारावरून राजकीय युद्ध:मिलिंद देवरा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना, कॉंग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर




ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र या दुःखद प्रसंगातही खासदार मिलिंद देवरा यांच्या एका वादग्रस्त ट्विटमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. देवरा यांनी काँग्रेसला उद्देशून केलेल्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसने अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला असून, शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो, अशा शब्दांत टीका केली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करत म्हटले होते की, आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज मुंबईत उपस्थित राहिलो. सर्वच स्तरांतील लोकांनी एकत्र येत प्रेम, संगीत आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रत्येक राजकीय पक्षाने या दु:खद प्रसंगी वरिष्ठ प्रतिनिधित्व सुनिश्चित केले होते. मात्र, एक अपवाद ठळकपणे दिसला, जो देशाच्या सांस्कृतिक स्पंदनापासून त्यांचा तुटलेपणा दर्शवतो, असे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटला महाराष्ट्र कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान.. कॉंग्रेसने प्रत्युत्तर देताना म्हटले की, लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान यालाही काही सीमा असते म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली आहे. मिलिंद देवरांच्या वडिलांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिका-यांनी स्वतः जाऊन आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि माणुसकी आहे. निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम मिलिंद देवरा करतायत पण दुसरीकडे, शिंदे गटाच्या दारात उभं राहून खासदारकीची भीक मागणारा आणि ती मिळाल्यावर उपकार फेडण्यासाठी खोटे बोलून काँग्रेसवर चिखलफेक करून शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो. ज्या काँग्रेसने तुमच्या घराण्याला नाव, मान, ओळख आणि सत्तेची दारं उघडून दिली, त्याच काँग्रेसवर उगाचच भुंकत फिरणं, ही कृतघ्नतेची परिसीमा नाही तर काय? असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला. तसेच मिलिंद देवरांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा आणि मग काँग्रेसवर बोलावं. लाचारीतही एक मर्यादा असते, पण ती ओलांडून निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम सध्या ते प्रामाणिकपणे करत असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. दरम्यान, आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आनंद आणि हेमंत भोसले यांना पत्र लिहिले आहे. मात्र हेमंत भोसले यांचे निधन 2015 मध्येच झाले होते. याची त्यांना कल्पना नसावी, अशी टीकाही केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *